Sunday, October 30, 2022

लिहिते व्हा

 ⚫ लिहिते व्हा ........ 

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे. मजेत ना ? अर्थात मजेतच असणार म्हणा. कारण तुम्हाला सध्या दिवाळीची हिवाळी सुट्टी आहे ना ? दिवाळीत मौज मज्जा करत असाल तर हे वाचायलाही तुमच्याकडे वेळ नसेल याचीही खात्री आहे. तरीही वाटलं , तुमच्याशी थोडं बोलावं. मला तर तुमची आठवण येते आहे. तुम्हाला ती येत असेल किंवा नसेलही. असो. तुम्ही तुमच्या दिवाळी सुट्टीत काहीतरी भन्नाट करत असणार ना ? म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या अनेक उत्तम गोष्टी करण्यात दंग असाल. तुमच्या कारागिरीची दाद द्यायलाच पाहिजे. पण तुम्हाला या सर्व कार्यभारातून उसंत मिळाली तर तुम्ही काही काळ लिहिण्याचा प्रयत्न करता काय ? सध्या लिहिणे ही दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे.

          चॅटिंग पुरते लिहिणे शिल्लक राहिलेले आहे. तेही शॉर्टकट्स वापरुन लिहिलेले असते. त्यात शुद्धलेखनाच्या प्रत्येक शब्दांत चुका पाहिल्या की वाचणाऱ्याला पुढच्या पिढीच्या लेखनाविषयी काळजी वाटायला लागते. म्हणून तुम्ही जसे वाचन करता , तसे लेखन करण्यासाठी मुद्दामहून वेळ काढला पाहिजे. कोणताही विषय घेऊन त्यावर पाच , दहा ओळीत लिहिता आले पाहिजे. निबंध लिहायचा असेल तर अधिकच उत्तम.

          तो लिहिताना तर तुम्हाला तुमच्या मनातील विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झालेली असते. तुम्ही एकदा लिहायला सुरुवात केलीत ना , मग तुम्हाला विचार करण्यासाठी डोकं चालवावं लागतं. तुमचं डोकं चालायला लागतं आणि तुमचं लेखन कागदावर उतरु लागतं. तुमच्या लक्षातही येणार नाही की तुम्ही किती छान लिहिताय ते !!!

          तुमच्याकडून एक सकस लेखन घडू लागण्याची ती सुरुवात असते. मात्र ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जमेल ते. प्रयत्न केलात तर तुम्ही कितीतरी छान छान निबंध , लेख , कविता , सुविचार लिहू शकाल.

          तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटेल की तुम्ही किती सुंदर लेखन करु शकताय ते !!! आता आधी सोप्या , साध्या विषयांवर लिहायला प्रारंभ करा. जे सुचेल ते लिहीत चला , ते नको वाटेल तेव्हा खोडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे ना !! अक्षर वळणदार असले तर आणखी उत्तम.

          तुमचं लेखन व्याकरणदृष्ट्या बरोबर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. लागू दे वेळ. होईल तेही बरोबर. थोडा संयम ठेवा.

          आज लिहायला सुरुवात केलीत आणि उद्या लेखक झालात असे होऊ शकणार नाही. त्यासाठी वाट बघावी लागेल. खूप चांगलं वाचावं लागेल. खूप चांगला विचार करावा लागेल.

खूप चांगलं ऐकावं लागेल. हे सगळे करता करता हळूहळू आपल्या लेखनाची गुणवत्ता वाढत जाईल हे तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही लिहिलेले दुसरे कोणीतरी वाचणार आहेत हे लक्षात घेऊन जर लेखन केलेत तर तुमचे लेखन वाचनीय बनावे यासाठी तुम्ही विचारपूर्वकच लिहाल. तुमच्या लेखनाला कोणीही प्रतिसाद देतील तेव्हा तुमचा आनंद कुठेही मावणारा नसेल.

          म्हणून लेखनाची कास धरा. पेनाने लिहिलात तर ती एक चांगली सवय आहे. तुम्ही लिहिलेले तुमच्या दैनिक वहीत संग्रहित होईल. तुमच्या स्वतःच्या रचना वाचताना तुम्हाला स्वर्ग अगदी जवळ आल्यासारखा वाटेल.बघा तरी करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, October 22, 2022

🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

 🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे , मजेत ना ? काय झालं ? डोळे चुरचुरताहेत ? रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर होता काय ? नाही म्हणजे त्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं झालं असेल तर तुम्हाला सकाळी तसं होण्याची शक्यता नक्कीच असू शकते. 

          हे दोन सख्खे भाऊ आहेत. पण त्यांची भेट कधीच घडत नाही. ज्यांच्यामुळे आपण सारी दुनिया पाहू शकतो , त्यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. आता तुम्ही हे वाचताय ना !! त्यावेळी त्या दोन सख्ख्या भावांचीच मदत घेताय ना ? हे दोन्ही भाऊ जबरदस्त आहेत. ते नसले असते तर आपलं जीवन शुष्क बनून गेलं असतं. ज्यांच्याकडे या धनाची कमतरता आहे , त्यांनाच ते नसण्याचं दुःख काय असेल ते सांगू शकतात. 

          एकदा आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळून बघा. मग समजेल तुम्हाला !! किती अवघड असेल असं नित्य जगणं !! याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. 

          आपण डोळस आहोत याचा अभिमान बाळगा. ह्या डोळ्यांची दोन पाखरे सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेण्यास आतुर झालेली असतात. या डोळ्यांनी काय पाहायचे हे त्या डोळ्यांना माहित नसते. ते नजर जाईल तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यांनी काय बघायचे आणि काय बघायचे नाही हे आपण शिकवायचे असते. 

          सृष्टीत खूप काही सामावलेले आहे. हे सगळं आपल्याला आजन्म डोळे भरुन पाहायचे आहे. त्यांना डोळ्यात साठवून ठेवायचे आहे. कितीवेळा तरी या दोन्ही डोळ्यांचे पारणे फिटले असेल अशा गोष्टी आपण पाहत आलो आहोत. अजून पाहणार आहोत. पण ज्या डोळ्यांनी आपण सारं जग पाहणार आहोत , त्या डोळ्यांची काळजी घेणं ही सध्याच्या काळाची नितांत गरज बनली आहे. 

          तुम्हां लहान मुलांना अल्पवयात लागलेले जाड काचेचे चष्मे बघून तर आम्हीही हवालदिल झालो आहोत. कसं होणार यांचं म्हातारपणी ? पूर्वीच्या लोकांना म्हातारपणापर्यंत चष्मा माहितीच नव्हता. हे चष्म्याचं गिफ्ट नको रे बाबा. 

          चष्मा असणं ही काही चांगलं दिसण्यासाठी परिधान केलेले आभूषण नाही. ते दिसण्यासाठीचं यंत्र आहे हे लक्षात आलं तरी पुरे आहे. काही मुलांना चष्मा हवा असतो. तुम्हाला जर चांगलं दिसत असेल तर चष्म्याचा अट्टाहास कशासाठी ? तो घालून काय तुमच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे का ? अजिबात नाही. उलट तुम्हाला यापुढे त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. हा चष्मा नसेल तर तुमचं दरवेळी अडणार आहे. तुम्हाला निसर्गाने दिलेले दोन डोळे असताना , पुन्हा हे आणखी दोन डोळे मागून घेणं हे कधीही वाईटच असणार आहे. 

          म्हणजे बघा. डोळे ही आपली फार मोठी संपत्ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेणे तुमच्याच हातात आहे. 

          त्यासाठी रोज उठल्यावर तुमचे हे दोन्ही मित्र चांगल्या स्वच्छ पाण्याने प्रेमाने धुवून घ्या. उगीच कसलीही बोटे डोळ्यात घालू नका. डोळा हे आपले नाजूक ज्ञानेंद्रिय आहे. पापणी , बुबुळ , बाहुली , पापणीचे केस ही त्याची उपइंद्रियेही महत्त्वाची कामे करतात. जरा जास्त डोळा चोळलात तर तो लाल होतो. तुम्ही रागावला असाल तरीही ते लालेलाल होतात. तुम्ही शांत असताना तुमचे डोळेही शांत झालेले असतात. डोळ्यांवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

          डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय डोळ्यांत कोणताही ड्रॉप घालू नका. त्यांचा सल्ला घेऊनच डोळ्यांवर उपचार करा. 

          रात्रीच्या काळोखात तुमच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडू देऊ नका. सूर्याकडे थेट पाहू नका. प्रखर प्रकाशाकडे पाहिल्यामुळे तुमच्या डोळ्यांतील स्नायूंना इजा पोहोचेल. अर्थात तुमची दिसण्याची क्षमता कमी होत जाईल. म्हणून अधिक काळजी घ्या. 

          पुस्तक वाचन करताना खूप जवळ किंवा खूप लांब धरुन वाचू नका. ठराविक एक ते सव्वा फुटाचं अंतर ठेवूनच वाचन करा. बरंच वाचन झालं , तर थोडा वेळ डोळ्यांची उघडझाप करा. डोळ्यांना व्यायाम द्या. एक दोन मिनिटे डोळे निवांत बंद ठेवा. आणि पुन्हा फ्रेश होऊन वाचन करा. जवळ साधं थंड पाणी असेल , तर ते डोळ्यांना लावा. बरे वाटेल. 

          पूर्वी आमची आई आम्ही घरी आलो की आमच्या डोळ्यांना पाणी लावायची आणि मगच घरात घ्यायची. डोळ्यांचे खूप काम झाले असेल तर त्यांना विश्रांती दिल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्यांचा आपण आजन्म वापर करणार आहोत , त्यांना जपणं हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. चला , माझेही डोळे आता दुखू लागले आहेत , मीही त्यांना थोडी विश्रांती देतो.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )






Wednesday, October 19, 2022

🛑 ग्रेट सायकलस्वार : उमेश मोरे

 🛑 ग्रेट सायकलस्वार : उमेश मोरे

          सहावीच्या पुस्तकात एक धडा आहे. ' सायकल म्हणते मी आहे ना !! ' या धड्यामध्ये सायकलचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. इंधनाशिवाय चालणारी आणि फुफ्फुसांना व्यायाम देणारी ही दुचाकी खरंच खूप गरजेची बनली आहे. आज खूप कमी लोकांना सायकलचे महत्त्व समजू लागले आहे. 

          त्या खूप कमी लोकांमध्ये आमच्या ' उमेश मोरे ' या शिक्षकमित्राचा अगदी वरचा क्रमांक लागेल. मोरे हे सायकलक्षेत्रात MORE ( मोअर ) कामगिरी केलेले सायकलस्वार असावेत. त्यांची कामगिरी कायम सुरु असते. ते घरी निवांत बसलेले पाहायला मिळणार नाहीत. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सायकलची निवड केली आहे. त्यांचं आपल्या सायकलवर जिवापाड प्रेम आहे. त्यांची सायकल एकदा सुरु झाली की इप्सित स्थळाला पोहोचेपर्यंत थांबत नसते. 

          कोरोना काळात उमेश मोरे सरांना ( अस्थमा ) तब्येतीचा कमालीचा त्रास सुरु झाला होता. तरीही त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेने त्यावर मात केली. सायकलमुळे त्यांचा अस्थमा पळून गेला. सायकल चालवताना जास्त सराव झाल्यानेही त्यांच्या पायाला इजा पोहोचली होती. त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपले सायकलस्वार निघाले पुढील फिरस्तीला. 

          त्यांनी एकदा ठरवले कि ठरवले. मग थांबणे त्यांना माहिती नाही. त्यांचे निर्णय चिरकाल टिकणारे असतात. त्यांचं इंग्रजी विषयाचं ज्ञान सखोल आहे. त्यांनी आपल्या घरी पुस्तकाचं घर उत्तमप्रकारे जोपासलं आहे. त्यांना वाचनाची नितांत आवड आहे. त्यांची मैत्री चोखंदळ असते. ते शक्यतो एखाद्याशी मैत्री करत नाहीत , आणि जर मैत्री केलीच तर ती कधी तुटू देत नाहीत. त्यांच्या सानिध्यात आल्याशिवाय ते संपूर्णपणे समजू शकणार नाहीत. 

          कोरोनाकाळात चेकपोस्टवर काही दिवस आम्ही एकत्र काम केल्यामुळे ते माझे एक चांगले सोबती झाले आहेत. मी लिहिलेले लेख ते मनापासून वाचतात आणि त्यावर आपली परखड मते व्यक्त करतात. 

          त्यांना हल्लीच एका सायकल मॅरेथॉनमध्ये  सलग ३०० किमी ते ४०० किमी सायकल रपेट मारताना दोन वेळा अपयश मिळाले. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला सराव सुरुच ठेवला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना अभूतपूर्व असं यश मिळालं. अपयश मिळालं म्हणून ते नाउमेद झाले नाहीत , त्यांनी मोठया उमेदीने अवघड स्पर्धा जिंकून मी ही जिंकू शकतो हे सिद्ध करुन दाखवले आहे. 

          ' सायकल म्हणते , मी आहे ना ! ' असं पाठाचं नाव उलट करावं लागेल. आता तेच सायकलला म्हणतील , " सायकलबाई , मी आहे ना !!! " उमेश मोरे हे नाव पुढील काही दिवसांत , महिन्यांत किंवा वर्षांत सायकलसाठी प्रचंड प्रसिद्ध झालेलं असेल ही आम्हां शिक्षकमित्रांसाठी सदैव अभिमानाची गोष्ट असेल. " उमेशराव , तुम्ही सायकलने पुढे चला , आम्ही टू व्हीलरने तुमच्यामागून येतोय " असं म्हटलं तरी तेच आमच्या पुढे जातील एवढाही आत्मविश्वास त्यांनीच आमच्यात पेरलाय. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471674 )




Tuesday, October 18, 2022

🛑 टाळा चॉकलेटचा लळा

 🛑 टाळा चॉकलेटचा लळा 

          मुलांनो , कसे आहात सगळे ? मजेत ना ? उठलात ना !! चला आता ब्रश करा. म्हणजे ब्रश केला नसेल तर सांगितलं. तसंही तुम्ही नियमित ब्रश करत असालच. 

          तुमच्या समोर ब्रश करताना आरसा आहे का ?  मग बघा तुमचं तोंड कसं दिसतंय ते !!! आता मस्त घासून ब्रश करून घ्या. ब्रशला पेस्ट लावलीत ना ? ओके. खूपच लावलीत. मग तर छानच. आता बसा दात घाशीत तासभर. ब्रश करायचा कंटाळा करु नका हं !!! 

          टुथब्रश चांगले वापरा. ते वापरुन वापरुन खराब झाले असेल , तर नवीन घ्या. तसेच वापरु नका. अशा बोथट झालेल्या ब्रशचा काहीही उपयोग नाही बरं का !!! ब्रशमुळेच आपले दात पांढरेशुभ्र होतात. 

          या पांढऱ्याशुभ्र दातांची निगा ठेवायला हवी. ते फक्त सुंदर दिसत असले तरी ते बोलण्यासाठी आणि चावण्यासाठी वापरायचे असतात. सर्वांना दाखवायचे दात समोर असतात. पण अन्न चावायाचे दात आतमध्ये लपलेले असतात. ते सहसा दिसत नाहीत. म्हणून म्हणतात ना , खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. 

          मुलांनो , आपल्याला आपले हे दोन्ही प्रकारचे दात मजबूत ठेवायचे आहेत. त्यासाठी तुमच्या चॉकलेटच्या आवडीला लांब ठेवा. लहानपणी तुम्ही कित्ती चॉकलेट्स खाल्ली असतील नाही का ? त्यामुळेच तुमचे दात किडले असतील. असे किडलेले दात दाखवायला किती लाज वाटते. सगळे चिडवत राहतात. स्वच्छ , सुंदर दातांची नेहमीच प्रशंसा केली जाते. आपलं सौन्दर्य खुलून दिसतं ते वेगळंच. 

          मग काय करणार ? दातांची काळजी घेणार ना !! तुमचेच दात आहेत , तर तुम्हालाच काळजी घ्यायला हवी. चॉकलेट खाल्लात की ते चांगले लागते , पण दाढेत रुतून बसते त्याचे काय ? मग दिवसभर ते चॉकलेट बाहेर पडायचे नावच घेत नाही. तुम्हाला वाटेल , बरं झालं , त्यामुळे मला ते चॉकलेट दिवसभर खायला मिळालं. पण बालमित्रांनो , हे चिकटून राहिलेलं चॉकलेट तुमच्या दातांच्या सडण्याची सुरुवात करीत असते. दात सडणे आणि किडणे या सारख्याच गोष्टी आहेत. तुमच्या तोंडाला खराब वास येतो. तुमच्या दातांचा ठिसूळपणा वाढत जातो. 

          सुरुवातीचे दुधाचे दात पडतात. मग कायमचे दात येण्यास प्रारंभ होतो. हे कायमचे दात आले की ते पडू देऊ नका. ते जर पडले तर डेंटिस्टकडे जावं लागतं. डेंटिस्ट म्हणजे कोण ? दातांचे डॉक्टर. ते तुम्हाला तुमच्या खराब असलेल्या दातांवर इलाज करतात. पण पुढील काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची असते. तुम्हाला तुमच्या दातांना डॉक्टरांकडे न्यायचे नसेल , तर तुम्ही त्यांची निगा राखा. 

          दिवसातून निदान दोनदा तरी ब्रश करा. त्यामुळे तुमच्या दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण निघून जातील. दात सडण्यापासून वाचतील. तोंडाला घाण वास येणार नाही. 

          चॉकलेट्स तुमची खूप आवडती आहेत हे मलाही माहिती आहे. या तुमच्या आवडीचा कोणीही दुरुपयोग करु शकतात. या चॉकलेटचे आमिष दाखवून तुम्हाला कोणीही अनोळखी व्यक्ती मोहात पाडू शकते. तुम्हाला ते चॉकलेट दिसत असते , त्यामागील वाईट हेतू तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही त्या चॉकलेटच्या मोहाला बळी पडता. त्यामुळे चॉकलेट देऊन मुलांना पळवून नेणाऱ्या टोळक्यांचे फावते. तुम्ही अनोळखी व्यक्तींकडून कोणतीही वस्तू घेण्यासाठी पुढे सरसावू नका. जिथे असाल तिथे तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना तुम्हाला खटकणारी गोष्ट त्वरित सांगा. अनोळखी व्यक्ती काहीतरी देऊ करत आहेत , म्हणून त्यांच्या मागेमागे जाऊ नका. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो , " चॉकलेटचा लळा , मुलांनो तुम्ही टाळा , नाहीतर येईल ते आपल्याच गळा." 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





🛑 पाढ्यांचा कडू परिपाठ गोड कराच

🛑 पाढ्यांचा कडू परिपाठ गोड कराच

          मुलांनो , तुमचे पाढे पाठ आहेत का ? बे पासून तीस पर्यंत पाढे म्हणजे तुमची गुणाकार , भागाकार , बेरीज , वजाबाकी आणि गणितीय विविध प्रक्रियांची तयारीच म्हणानात. बे म्हणजे दोनचा पाढा. पहिल्यापासून त्याला बे चा पाढा का म्हणतात याची कारणे शोधण्यापेक्षा तो पाठ असणं खूप गरजेची गोष्ट आहे. बे एके बे , बे दुणे चार असे म्हणत बे चा पाढा म्हणण्याची खूप जुनी पद्धत आहे. आता इंग्रजी शिकणारी मुले टू वन्स आर टू , टू टुज आर फोर वगैरे म्हणताना दिसतात. पाढे कसेही पाठ करा , पण ते पाठ असणे तुमच्या गणिताचा मूलभूत पाया असणार आहे. 

          मुलांनो , हे पाढे पाठ करण्यासाठी पूर्वी सायंकाळी दररोज प्रत्येक घरात पाढ्यांची संथा चाले. शाळेतील शिक्षकही पाढे पाठांतर झाल्याखेरीज पुढील घटक शिकवीतच नसत. आमच्या शिक्षकांनी त्यावेळी आमचे पाढे कसे पाठ करुन घेतले ते आमच्या पाठीलाही चांगलेच ज्ञात आहेत. पाढे पाठ नसले तर हातावर , पायावर किंवा पाठीवर मार ठरलेलाच असे. तिथे ' चुकीला माफी नाही ' असेच असे. त्यावेळी खाल्लेला मार आजच्या आमच्या अचूक गणिताचं अभूतपूर्व यशच म्हणावं लागेल. त्यावेळी घेतलेल्या शिस्तबद्ध परिपाठामुळे आमची पिढी तावून सुलाखून निघाली हे तितकेच खरे आहे. 

          आमचे प्राथमिक शाळेतील प्रयोगातून विज्ञान आणि समाजशास्त्र शिकवणारे नारकरगुरुजी भले शिक्षक. ते जास्त बोलत नसत. परिपाठात तर ते एकही वाक्य बोलत नसत. पण त्यांचा वर्गातील प्रवेश दणाणून सोडणारा असे. आमच्या सातवी अ वर्गातील चोवीस पैकी चोवीस मुलांचे तीस पर्यंतचे पाढे पाठ असणे ही त्यांचीच देण होती. त्यांच्या करारी शिस्तीने आम्ही पाढे पाठ केले. पण आज वाटतंय , आम्ही आज जे आहोत त्यात त्यांचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा असेल. 

          या पाठ असलेल्या पाढ्यांचा आम्हाला चौथी , सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी खूपच उपयोग झाला. आमचा उदाहरणे सोडवण्याचा वेग कमालीचा वाढला. नारकरगुरुजींनी शाबासकी दिली तर ती आमच्यासाठी ' उंबराच्या फुलासारखी ' असे. आम्ही खूप कमी शाबासकी मिळवली असेल , पण त्यांच्या सुसंस्कारांमुळे आमच्यातील गणिताचा अभ्यासक घडत गेला. त्यानंतर माध्यमिक विद्यालयात गणितासाठी जास्त श्रम पडले नाहीत. 

          म्हणून तुम्हाला सांगतो मुलांनो , दररोज पाढे म्हणा. पाठ असले तरी म्हणा. झोपेत असताना जरी तुम्हाला एखादा पाढा म्हणायला सांगितला तरी तो चुकणार नाही अशी तयारी करा. तुम्ही हे नक्की करु शकता. बघा करुन. केल्याशिवाय कसे समजेल. करुन तर बघा. तुमचा त्यामुळे कमी असलेला आत्मविश्वास वाढत जाईल. बेरीज , वजाबाकी , गुणाकार आणि भागाकार सर्व मूलभूत प्रक्रिया झटपट सुटत जातील. तुम्हालाच तुमचे आश्चर्य वाटेल. 

          कणकवली तालुका शिक्षण विभागाने ' तारखेनुसार पाढा ' हा तालुक्याचा सुरु केलेला उपक्रम म्हणूनच स्तुत्य आहे. मुलांनो , तुम्ही फक्त त्याचा सतत पाठपुरावा करण्याची गरज आहे. एका महिन्यात ही साध्य होणारी गोष्ट आहे. ती बाराही महिने सुरु ठेवायची अजिबात गरज नाही. मात्र पाठांतर संथा सराव नित्य नियमित सुरु ठेवायलाच हवा. 

          चला तर मग , आज जी तारीख आहे तो पाढा आधी पाठ करा. उद्या पुढचा करा. मागचा आणि पुढचा करत करत तुमचे तीस पर्यंतचे पाढे कधीच पाठ होतील बघा. या पाढ्यांचा वापर उदाहरणे सोडवताना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या उपक्रमाचा उपयोग झाला असे म्हणायचे. आता जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर बाजूला ठेवाल आणि तोंडी उदाहरणे सोडवाल , तेव्हा तुमच्या अंगात गणित भिनलेच म्हणून समजा. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )





Monday, October 17, 2022

🛑 वाचन मेवा सेवा

🛑 वाचन मेवा सेवा

          मुलांनो , वाचन ही सर्वात चांगली सवय आहे. ती स्वतःला लावलात की दुसरे काही नको. मग हिच वाचनाची सवय तुमची आवड व्हायला वेळ लागणार नाही. ही तुमची  आवड काही दिवसांतच छंद बनून जाईल ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही. 

          केवळ साक्षर होणे हे तुमचे उद्दिष्ट नाही. तुम्हाला खूप खूप वाचता येण्यासाठी सतत वाचत राहण्याची गरज आहे. तुम्ही त्यासाठी काय करता ? दररोज दहा पेक्षा जास्त पानांचं वाचन झालंच पाहिजे. मराठी वाचा , हिंदी वाचा. झालंच तर इंग्रजीही वाचा. पाठ्यपुस्तके वाचा. गोष्टींची पुस्तके वाचा. शालेय ग्रंथालयातील पुस्तके तर तुमची वाटच पाहत असतात. तुमच्या हातात पडली की त्यांच्या असण्याचं सोनं होऊन जातं. 

          मुलांनो , " वाचाल तर वाचाल " हा सुविचार तुम्ही ऐकला किंवा वाचला असेल. त्यात सारं काही आहे. तुम्हाला एकदा वाचनाचा छंद जडला की तुम्ही मिळतील ती पुस्तकं वाचून फडशा पाडत राहाल. बघा तरी तसे करुन. तुम्हाला नक्कीच जमेल ते. तुम्ही एवढं सगळं करता , मग हे जमायला काय !!! ही तर अगदी सोप्पी गोष्ट आहे , नाही का ? 

          पुस्तकांचा संग्रह असणं ही सुद्धा तुमची आवडती सवय बनू शकते. तुमचं स्वतःचं मिनी वाचनालय असलं की तुमची मज्जाच मज्जा. कधी वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातले एखादे पुस्तक काढून वाचू शकता. तुम्हाला एखादा निबंध लिहायचा असला , तर त्यातला संदर्भ वापरु शकता. 

          मुलांनो , आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या. रेडिमेड निबंध कधीच लिहू नका. निबंधाचे पुस्तक जवळ असावे , पण त्याची नक्कल करु नका. त्यातील निबंध वाचा आणि न बघता स्वतःच्या मनाने नवीन निबंधाची निर्मिती करा. आता लिहिलेला नवा निबंध म्हणजे तुमची स्वतःची निर्मिती असेल. आता बघा , तुम्हाला जो आनंद झालेला असेल , तो तुम्ही शब्दांत व्यक्त करणेही कठीण होऊन बसेल. अभ्यासात असा आनंद होणं म्हणजेच खरा अभ्यास. 

          मुलांनो , वाचन करताना ते समजपूर्वक वाचा. तुम्ही नुसती अक्षरे आणि कोरडे शब्द वाचू नका. त्यातला अर्थ समजून घ्या. आता हा अर्थ समजणार कसा ? हा प्रश्न तुम्हां लहानांनाच काय मोठ्यांनाही पडतो बरं का ? मग आम्ही मोठी माणसे काय करतो , तीच ओळ , तोच परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचतो. मला वाटतं , तुम्हीही तसंच करावं. पुन्हा , पुन्हा वाचावं. आणि एकदा समजलं की ते चांगलं लक्षात ठेवावं. या लक्षात ठेवलेल्या ज्ञानाचा वापर आपल्याला पुढे अनेक ठिकाणी करायचा आहे. बोलताना , भाषण करताना , निबंध लिहिताना , उत्तरे लिहिताना , कविता लिहिताना , पत्र लिहिताना आणि बरंच काही लिहिताना या शब्दांचा तुम्ही वापर कराल. तुम्ही एकदा छान वाचायला शिकलात की मग या साऱ्या गोष्टी तुम्हाला पटापट येत जातील. 

          मुलांनो , तुम्ही दोन प्रकारचं वाचन करता. एक म्हणजे प्रकटवाचन. हे वाचन मोठ्याने करायचे असते. तुमचं हे वाचन दुसऱ्यांनाही ऐकू येतं. शाळेत तुम्हाला सर्वांसमोर जे वाचन करायला लावतात ना , ते तुमचं प्रकटवाचनच असतं. यालाच ' लावडेड रिडींग ' असं म्हणतात. दुसरं वाचन म्हणजे मूकवाचन. हे वाचन फक्त डोळ्यांनी करायचं असतं. त्यावेळी आपल्या ओठांची हालचाल मुळीच करायची नसते. तुमच्या डोळ्यांच्या कक्षेत जेवढे शब्द , वाक्ये येतील ती आवाज न करता मनात वाचायची असतात. याला ' सायलेंट रिडींग ' असंही म्हणतात. तुम्ही ही दोन्ही प्रकारची वाचने करत असणार याची खात्री आहे. जर करत नसाल तर आजपासून सुरु करा. तुम्हाला हे नक्की जमेल. मग तुम्ही आपल्या वाचनाचा वेग वाढवत चला. एका मिनिटांत कालपेक्षा आज जास्त शब्द वाचले याचे स्वतःचे मूल्यमापन करा. जलदगतीने वाचन करण्याला ' गतीवाचन ' म्हणतात. अर्थात ' स्पीड रिडींग ' तुम्हाला सगळ्यात स्पीड वाढवणं आवडतं ना ? मग वाचनाच्या स्पीडमध्ये अजिबात मागे राहू नका. 

          ज्याचे वाचन चांगले असते , तो चारचौघात उठून दिसतो. तुम्ही तुमचे वाचन नक्कीच समृद्ध कराल आणि चारचौघातच नाही तर सर्वोत्तम ठराल. चला तर मग , वाचनाचा मेवा सेवन करताय ना !!!

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





🛑 माझी किरणे कायम तुमच्यासाठी

🛑 माझी किरणे कायम तुमच्यासाठी

          मुलांनो , तुम्ही सकाळी किती वाजता उठता ? लवकर उठलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या उठण्याची मी किती वाट पाहात असतो ? तुम्ही सकाळी लवकर उठून माझ्या येण्याची वाट पाहात असाल तर किती चांगली गोष्ट असेल ती !!! 

          " लवकर निजे , लवकर उठे , तया आरोग्य , संपत्ती , ज्ञान भेटे " हे सुवचन तुम्हाला माहिती असेलच. काल रात्री तुम्ही उशिरा झोपला असाल. कारण तुमची आवडती सिरीयल उशीराच सुरु होते आणि खूप उशिरानेच संपते. त्यामुळे तुम्ही उशिरा झोपलात , नाही का ? मग अंथरुणावर पडल्यावर सगळ्यांची स्टेटस बघत राहिल्यामुळे आणखी अधिक उशीर झाला ना झोपायला !!! हे जसं काल घडलं तसं आजही घडण्याची दाट शक्यता आहे. पण म्हणून तुम्ही तसं मुळीच करु नका हं !!!!

          प्लिज , प्लिज , प्लिज , आजपासून तुम्ही लवकर झोपण्याचा नक्कीच प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी एक छानसा मराठी किंवा तुमच्या आवडत्या भाषेतील उतारा किंवा गोष्ट नक्की वाचा. ते चांगले शब्द तुमच्या मनात गुंजत राहिले पाहिजेत. सकाळी उठताना तुम्हाला किती बरे वाटेल म्हणून सांगू. तुमच्या लवकर उठण्याची मलाही प्रतिक्षा लागलेली आहेच. तुम्ही मला पाहायला बाहेर येता आणि मी तुम्ही बाहेर येण्याची वाट पाहत असतो. किती मस्त हवा सुटलेली असते. आल्हाददायक हवा तुमच्या नाकात जाण्यासाठी जणू आतुरलेली असते. कुठूनतरी कोकिळेचे मधुर स्वर कानांना तृप्त करु लागतात. मन कसं प्रसन्न होऊन जातं. मनात सकारात्मक विचारांचं मंथन सुरु होतं. 

          मी आपला तुमच्यासाठी सदासर्वकाळ पिवळी कोवळी किरणं घेऊन सदैव हसतमुखाने येत असतोच. माझं येणं बघण्यासाठी तुमच्यासारखे कित्येकजण पहाटे उठून डोंगरावर जातात. मी डोंगरातून वर येतानाचं माझं विलोभनीय रुप पाहताना तहानभूक व्याकुळलेले योगी मी सदैव पाहात आलोय. मी डी जीवनसत्त्व देतो. मी निघून जात असताना पडणारा संधीप्रकाश पाहण्यासाठीही लोक समुद्रकिनारी गर्दी करतात. मी संपूर्ण निघून जाईपर्यंत ते एकटक माझ्याकडे पाहातच राहतात. 

          एव्हाना मी कोण बोलतोय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. मुलांनो , तुम्ही माझ्यासारखे अखंड व्रतस्थ व्हा. मी माझ्या येण्यात आणि जाण्यात कधीही खंड पडू देत नाही. तुम्ही माझी ही एक सवय जरी घेतली तरी तुम्ही नक्कीच चांगली मुले व्हाल. चला तर मग , तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी दिलेला अभ्यास , उपक्रम आणि कृती पूर्ण करा.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...