🛑 वाचन मेवा सेवा
मुलांनो , वाचन ही सर्वात चांगली सवय आहे. ती स्वतःला लावलात की दुसरे काही नको. मग हिच वाचनाची सवय तुमची आवड व्हायला वेळ लागणार नाही. ही तुमची आवड काही दिवसांतच छंद बनून जाईल ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही.
केवळ साक्षर होणे हे तुमचे उद्दिष्ट नाही. तुम्हाला खूप खूप वाचता येण्यासाठी सतत वाचत राहण्याची गरज आहे. तुम्ही त्यासाठी काय करता ? दररोज दहा पेक्षा जास्त पानांचं वाचन झालंच पाहिजे. मराठी वाचा , हिंदी वाचा. झालंच तर इंग्रजीही वाचा. पाठ्यपुस्तके वाचा. गोष्टींची पुस्तके वाचा. शालेय ग्रंथालयातील पुस्तके तर तुमची वाटच पाहत असतात. तुमच्या हातात पडली की त्यांच्या असण्याचं सोनं होऊन जातं.
मुलांनो , " वाचाल तर वाचाल " हा सुविचार तुम्ही ऐकला किंवा वाचला असेल. त्यात सारं काही आहे. तुम्हाला एकदा वाचनाचा छंद जडला की तुम्ही मिळतील ती पुस्तकं वाचून फडशा पाडत राहाल. बघा तरी तसे करुन. तुम्हाला नक्कीच जमेल ते. तुम्ही एवढं सगळं करता , मग हे जमायला काय !!! ही तर अगदी सोप्पी गोष्ट आहे , नाही का ?
पुस्तकांचा संग्रह असणं ही सुद्धा तुमची आवडती सवय बनू शकते. तुमचं स्वतःचं मिनी वाचनालय असलं की तुमची मज्जाच मज्जा. कधी वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातले एखादे पुस्तक काढून वाचू शकता. तुम्हाला एखादा निबंध लिहायचा असला , तर त्यातला संदर्भ वापरु शकता.
मुलांनो , आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या. रेडिमेड निबंध कधीच लिहू नका. निबंधाचे पुस्तक जवळ असावे , पण त्याची नक्कल करु नका. त्यातील निबंध वाचा आणि न बघता स्वतःच्या मनाने नवीन निबंधाची निर्मिती करा. आता लिहिलेला नवा निबंध म्हणजे तुमची स्वतःची निर्मिती असेल. आता बघा , तुम्हाला जो आनंद झालेला असेल , तो तुम्ही शब्दांत व्यक्त करणेही कठीण होऊन बसेल. अभ्यासात असा आनंद होणं म्हणजेच खरा अभ्यास.
मुलांनो , वाचन करताना ते समजपूर्वक वाचा. तुम्ही नुसती अक्षरे आणि कोरडे शब्द वाचू नका. त्यातला अर्थ समजून घ्या. आता हा अर्थ समजणार कसा ? हा प्रश्न तुम्हां लहानांनाच काय मोठ्यांनाही पडतो बरं का ? मग आम्ही मोठी माणसे काय करतो , तीच ओळ , तोच परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचतो. मला वाटतं , तुम्हीही तसंच करावं. पुन्हा , पुन्हा वाचावं. आणि एकदा समजलं की ते चांगलं लक्षात ठेवावं. या लक्षात ठेवलेल्या ज्ञानाचा वापर आपल्याला पुढे अनेक ठिकाणी करायचा आहे. बोलताना , भाषण करताना , निबंध लिहिताना , उत्तरे लिहिताना , कविता लिहिताना , पत्र लिहिताना आणि बरंच काही लिहिताना या शब्दांचा तुम्ही वापर कराल. तुम्ही एकदा छान वाचायला शिकलात की मग या साऱ्या गोष्टी तुम्हाला पटापट येत जातील.
मुलांनो , तुम्ही दोन प्रकारचं वाचन करता. एक म्हणजे प्रकटवाचन. हे वाचन मोठ्याने करायचे असते. तुमचं हे वाचन दुसऱ्यांनाही ऐकू येतं. शाळेत तुम्हाला सर्वांसमोर जे वाचन करायला लावतात ना , ते तुमचं प्रकटवाचनच असतं. यालाच ' लावडेड रिडींग ' असं म्हणतात. दुसरं वाचन म्हणजे मूकवाचन. हे वाचन फक्त डोळ्यांनी करायचं असतं. त्यावेळी आपल्या ओठांची हालचाल मुळीच करायची नसते. तुमच्या डोळ्यांच्या कक्षेत जेवढे शब्द , वाक्ये येतील ती आवाज न करता मनात वाचायची असतात. याला ' सायलेंट रिडींग ' असंही म्हणतात. तुम्ही ही दोन्ही प्रकारची वाचने करत असणार याची खात्री आहे. जर करत नसाल तर आजपासून सुरु करा. तुम्हाला हे नक्की जमेल. मग तुम्ही आपल्या वाचनाचा वेग वाढवत चला. एका मिनिटांत कालपेक्षा आज जास्त शब्द वाचले याचे स्वतःचे मूल्यमापन करा. जलदगतीने वाचन करण्याला ' गतीवाचन ' म्हणतात. अर्थात ' स्पीड रिडींग ' तुम्हाला सगळ्यात स्पीड वाढवणं आवडतं ना ? मग वाचनाच्या स्पीडमध्ये अजिबात मागे राहू नका.
ज्याचे वाचन चांगले असते , तो चारचौघात उठून दिसतो. तुम्ही तुमचे वाचन नक्कीच समृद्ध कराल आणि चारचौघातच नाही तर सर्वोत्तम ठराल. चला तर मग , वाचनाचा मेवा सेवन करताय ना !!!
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

.jpeg)
No comments:
Post a Comment