🛑 ग्रेट सायकलस्वार : उमेश मोरे
सहावीच्या पुस्तकात एक धडा आहे. ' सायकल म्हणते मी आहे ना !! ' या धड्यामध्ये सायकलचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. इंधनाशिवाय चालणारी आणि फुफ्फुसांना व्यायाम देणारी ही दुचाकी खरंच खूप गरजेची बनली आहे. आज खूप कमी लोकांना सायकलचे महत्त्व समजू लागले आहे.
त्या खूप कमी लोकांमध्ये आमच्या ' उमेश मोरे ' या शिक्षकमित्राचा अगदी वरचा क्रमांक लागेल. मोरे हे सायकलक्षेत्रात MORE ( मोअर ) कामगिरी केलेले सायकलस्वार असावेत. त्यांची कामगिरी कायम सुरु असते. ते घरी निवांत बसलेले पाहायला मिळणार नाहीत. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सायकलची निवड केली आहे. त्यांचं आपल्या सायकलवर जिवापाड प्रेम आहे. त्यांची सायकल एकदा सुरु झाली की इप्सित स्थळाला पोहोचेपर्यंत थांबत नसते.
कोरोना काळात उमेश मोरे सरांना ( अस्थमा ) तब्येतीचा कमालीचा त्रास सुरु झाला होता. तरीही त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेने त्यावर मात केली. सायकलमुळे त्यांचा अस्थमा पळून गेला. सायकल चालवताना जास्त सराव झाल्यानेही त्यांच्या पायाला इजा पोहोचली होती. त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपले सायकलस्वार निघाले पुढील फिरस्तीला.
त्यांनी एकदा ठरवले कि ठरवले. मग थांबणे त्यांना माहिती नाही. त्यांचे निर्णय चिरकाल टिकणारे असतात. त्यांचं इंग्रजी विषयाचं ज्ञान सखोल आहे. त्यांनी आपल्या घरी पुस्तकाचं घर उत्तमप्रकारे जोपासलं आहे. त्यांना वाचनाची नितांत आवड आहे. त्यांची मैत्री चोखंदळ असते. ते शक्यतो एखाद्याशी मैत्री करत नाहीत , आणि जर मैत्री केलीच तर ती कधी तुटू देत नाहीत. त्यांच्या सानिध्यात आल्याशिवाय ते संपूर्णपणे समजू शकणार नाहीत.
कोरोनाकाळात चेकपोस्टवर काही दिवस आम्ही एकत्र काम केल्यामुळे ते माझे एक चांगले सोबती झाले आहेत. मी लिहिलेले लेख ते मनापासून वाचतात आणि त्यावर आपली परखड मते व्यक्त करतात.
त्यांना हल्लीच एका सायकल मॅरेथॉनमध्ये सलग ३०० किमी ते ४०० किमी सायकल रपेट मारताना दोन वेळा अपयश मिळाले. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला सराव सुरुच ठेवला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना अभूतपूर्व असं यश मिळालं. अपयश मिळालं म्हणून ते नाउमेद झाले नाहीत , त्यांनी मोठया उमेदीने अवघड स्पर्धा जिंकून मी ही जिंकू शकतो हे सिद्ध करुन दाखवले आहे.
' सायकल म्हणते , मी आहे ना ! ' असं पाठाचं नाव उलट करावं लागेल. आता तेच सायकलला म्हणतील , " सायकलबाई , मी आहे ना !!! " उमेश मोरे हे नाव पुढील काही दिवसांत , महिन्यांत किंवा वर्षांत सायकलसाठी प्रचंड प्रसिद्ध झालेलं असेल ही आम्हां शिक्षकमित्रांसाठी सदैव अभिमानाची गोष्ट असेल. " उमेशराव , तुम्ही सायकलने पुढे चला , आम्ही टू व्हीलरने तुमच्यामागून येतोय " असं म्हटलं तरी तेच आमच्या पुढे जातील एवढाही आत्मविश्वास त्यांनीच आमच्यात पेरलाय.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471674 )


No comments:
Post a Comment