Saturday, August 23, 2025

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

 


गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

    गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शहरातून गावाकडे परत येणाऱ्या चाकरमान्यांमुळे घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या येण्याने खरं तर सणाचा खरा आनंद द्विगुणित होतो.

    घरातील प्रत्येक जण बाप्पाच्या अकरा दिवसांच्या पाहुणचारासाठी तयारी करण्यात मग्न झाला आहे. घराची साफसफाई, रंगरंगोटी आणि इतर कामं वेगात सुरू आहेत. श्रावण संपून आता भाद्रपद सुरू झाला आहे आणि शुद्ध चतुर्थीच्या दिवशी येणारा 'गणपती बाप्पा' आपल्यावर सदैव कृपा करतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे. तो येतो आणि आपली सर्व विघ्नं दूर करतो.

    सणासुदीच्या या वातावरणात मुलांनाही सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. त्यांना घरातल्या कामांत मदत करायची आहे, गणपतीच्या सजावटीत पुढाकार घ्यायचा आहे. मुलांचं मन निर्मळ असतं, त्यांचे विचार मोठे असतात.

    असाच एक अनुभव माझ्यासोबत घडला. एक मुलगा शाळेत आला आणि म्हणाला की त्याला ताप आला आहे आणि त्याला घरी जायचं आहे. खरंच त्याला ताप होता. पण त्यामागे एक गोड कारण होतं. सकाळी घरातून निघताना त्याला आठवलं की बाबा घराला रंग देणार आहेत. ‘मी बाबांना मदत करणार’ हा विचार त्याच्या मनात होता. त्याच्या चेहऱ्यावरची बाप्पाच्या आगमनाची ओढ पाहून त्याला घरी पाठवणं भाग होतं. हीच ती निरागस भक्ती! प्रत्येकाचं बाप्पावरचं प्रेम वेगळं असतं, आणि हेच खरं निष्पाप प्रेम आहे.

    याच मुलाचा आणखी एक अनुभव माझ्या मनात घर करून बसला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "सर, मी मोठ्या मुलांसोबत ध्वजारोहण करायला येऊ का?"

    मी त्याला समजावले, "बाळा, ध्वजारोहणासाठी लवकर यावं लागतं. तू फक्त १५ ऑगस्टला सकाळी लवकर ये. १३ आणि १४ ऑगस्टला नेहमीप्रमाणे शाळेत ये."

    माझं बोलणं ऐकून त्याचा चेहरा हिरमुसला झाला. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मलाही वाईट वाटलं. त्याला तीनही दिवस ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. हे होतं त्याचं देशाबद्दलचं प्रेम. मुलं त्यांच्या कृतीतून खूप काही सांगून जातात. फक्त ते समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आपल्यात असायला हवी, असं मला नेहमीच वाटतं.

लेखन : प्रवीण अशितोष कुबल 



No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...