Friday, October 18, 2024

स्काऊट म्हणजे चैतन्य

🔴 स्काऊट म्हणजे चैतन्य

        स्काऊट म्हणजे चैतन्य. शाळेत हे चैतन्य आणण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकच करत असतात.  शिक्षक शाळेत येतात तेव्हा चैतन्याच्या लहरी शाळेत दाखल होत असतात.  स्काऊट , गाईड , कब आणि बुलबुल चं एक दिवसीय उजळणी ट्रेनिंग नुकतंच पार पडलं .  
        ठिकाण होतं देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कुल.  माझी या शाळेत दोन ते तीन प्रशिक्षणं झाली होती .  एकदा मी मास्टर ट्रेनर सुद्धा होतो.  देवगड तालुक्यात काम करताना आलेले अनेक शैक्षणिक अनुभव शेअर करताना आज माझ्या काही जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.  सिंधुदुर्ग जिल्हयात नोकरी करताना पहिल्यांदा देवगड तालुक्यात शैक्षणिक कार्य करण्याचं भाग्य लाभलं. दोन शाळांमध्ये काम करताना दोन्ही ठिकाणी मिळालेले अनुभव मला स्वतःला सतत अद्ययावत करणारे होते. आंब्याच्या दिवसांत तिथल्या मोहोराचा सुगंधी वास नाकात भरुन राहिलेला आहे. तो गंध पुन्हा नाकात आला कि जीवनाचं सार्थक होऊन जातं. स्वच्छ , शुद्ध श्वास घेतल्याचा आनंद मिळतो. माझ्यावर आलेल्या अनाहूत संकटामुळे मला देवगड सोडावं लागलं. त्यामुळे मी देवगडला पारखा झालो. पुन्हा आज एक दिवसासाठी प्रशिक्षण स्थळी गेल्यामुळे पुन्हा सगळ्या पूर्वीच्या आठवणी माझ्या मनचक्षू समोर फेर धरुन नाचू लागल्या.  
        मी कबमास्टर म्हणून प्रशिक्षण द्यायला पुढे सरसावलो. माझ्यातील कबमास्टर पुन्हा सर्व शिक्षकांशी संवाद साधू लागला होता. मी वर्गात जसं शिकवतो , अगदी जसाच्या तसाच शिक्षकांना ट्रेनिंग देऊ लागलो होतो.  मी माझं पूर्ण कौशल्य पणाला लावलं होतं. हल्लीच अनेक शाळांमधून नवनियुक्त शिक्षक नियुक्त केले गेले आहेत. जुन्या शिक्षकांकडून त्यांना चांगले संदेश मिळणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये मला माझा पूर्वीचा मी दिसत होता.  मी नवीन नियुक्त झालो असताना उत्साह ओसंडून वाहत होता.  नवनवीन ज्ञान घेऊन नित्यनूतन टवटवीत बनण्याचा ध्यास मला लागलेला होता.  तो ध्यास मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे .  मला दररोज काहीतरी चांगलं नवीन शिकायला मिळावं हे मी ठरवलेलं असतं. त्यामुळे नवीन आणि जुन्या शिक्षकांसमोर मी मला मोकळं केलं. त्यांनी माझ्यातलं चैतन्य पाहून त्यांच्यातलं चैतन्य जागृत झालं असावं.  त्यांनी दिलेला प्रतिसाद खरंच दाद देण्यासारखा होता.  
        मी त्यांना भौतिकशास्त्र विषयातील ' ट्युनिंग फॉर्क ' चं उदाहरण दिलं. हा ट्युनिंग फॉर्क रबरी टायरच्या तुकड्यावर आपटल्यानंतर ' कंप ' पावत असे. त्यातील ऊर्जा तात्पुरती असे .  कंप होणं थांबलं कि त्याच्यातील ऊर्जा शून्य होत असे. मीही तसंच करत होतो .  या नव्या जुन्या शिक्षकांमध्ये तात्पुरतं चैतन्य निर्माण करत होतो. हे चैतन्य टिकवून ठेवणं हे सर्वस्वी त्यांच्याकडेच होतं. त्यांनी या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष मुलांसाठी करावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही नेहमी करत असतो. असो. सुजाण शिक्षक नक्कीच आपली ज्ञानाची ज्योत नित्य तेवत ठेवत राहतील याबद्दल मला अजिबात शंका नाही.  
        आपण शिक्षक म्हणून अनेक उत्तम उपक्रम शाळेत राबवत असतो. या उपक्रमांना ' स्काऊट , गाईड , कब आणि बुलबुल ' या संकल्पनेचा स्पर्श केलात कि झालं. स्काऊट हा आता आपल्या अभ्यासक्रमातीलच विषय आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा याच्या तासिका घेताना ' निसर्गाच्या सानिध्यात ' घ्यायला हवी. कारण स्काऊटींग हे एक आऊटींग आहे. मुलांना निसर्गातील आल्हाददायक वातावरणात शिकायलाही खूप आनंददायक वाटतं. कारण निसर्ग म्हणजे बिनभिंतींची शाळा असते. तिला खिडक्या नसतात. मुले नेहमी शिकवत असताना वर्गाच्या बाहेर बघत असताना दिसतात. निसर्गाला खिडक्या नाहीत कि दारे !!! मुले त्यावेळी आपल्याकडेच पाहतात .  आपलं चैतन्य मुलांना दिलं तर ते वाढत जातं. मुलं चैतन्य परिधान करुन भारावून शिकत राहतात. त्यांच्या या टिपून घेण्याच्या सवयीला हेरलं पाहिजे .  त्यांच्या सर्व गोष्टी तेव्हाच लक्षात राहतील , जेव्हा तुम्ही शिकवत असलेले शैक्षणिक घटक वेगळ्या पद्धतीने शिकवता. खेळत खेळत ज्ञानाची रचना करत शिकल्याने दृढीकरण होण्यास मदत होते. थोडेच शिकवा , पण जे शिकवाल ते त्यांच्या तनामनात कायमचे रुजले पाहिजे. 
        म्हणूनच मला या स्काऊट विषयाबद्दल कायमच कौतुक आणि अप्रूप वाटत आलं आहे. असा कोणताही विषय नसेल कदाचित जो तुम्ही  स्काऊटमध्ये शिकवू शकत नाही. मानसिक आरोग्य , योग , दिशा , नकाशा , कृती , उपक्रम , गीतगायन , नृत्य , अभिनय , गृहकार्ये , सेवाकार्ये , संग्रह , रिकामपणाची कामगिरी , पाठांतर , संस्कारगाणी , संस्कारनाट्ये , संस्कारगोष्टी , संस्कारखेळ आणि अशा कितीतरी क्रियाकलापांनी स्काऊटचा अभ्यास आपल्या मुलांना समृद्ध बनवू शकतो. माझ्या जीवनात जेव्हा केव्हा दुःखाच्या आठवणींचे वारे वाहतात , तेव्हा तेव्हा मी स्काऊटला जवळ केले आहे. तुम्ही या स्काऊट चैतन्याचे महत्त्व जाणा आणि तुमच्या आयुष्यात अधिकचं चैतन्य आणा. 

Ⓒ  प्रवीण अशितोष कुबल , स्काऊटमास्टर / कबमास्टर 
मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं . १ 
        

Thursday, October 17, 2024

🛑 शारदे हवे तुझे वरदान

 🛑 शारदे हवे तुझे वरदान


          मुलांनो, नुकताच प्रत्येक शाळेत ' शारदोत्सव ' संपन्न झाला असेल. तसाच तो आमच्या शाळेतही दिमाखात साजरा झाला. तुमच्याही शाळेत ' सरस्वती पूजन ' झालेच असेल. हो ना!!!!

          दरवर्षी हा दिवस येतो. पण प्रत्येक वर्षाचा अनुभव आगळा वेगळा असतो. सरस्वती मातेचं ते तेजस्वी रुप पाहून मन भरुन येतं. मला बालपणापासून ' शारदा पूजन ' खूप आवडत आले आहे. मी शिक्षक झाल्यामुळे मी सतत तिच्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे. तिचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे म्हणून मी ' गुरुजी ' झालो आहे. 

          माझे प्राथमिक शिक्षण कणकवली नं. ३ शाळेत अतिशय संस्कारमय झाले आहे. तिथे साजरा होणारा ' शारदेचा उत्सव ' आमच्यासाठी प्रतिवर्षी मोठ्या उत्सवापेक्षा कमी नसायचा. जणू आमच्या घरात सण साजरा होत आहे असे मला वाटे. त्या शाळेत आम्हांला ' साटमबाई ' होत्या. त्या खूप प्रेमळ होत्या. सरस्वती मातेवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्यामुळेच आम्ही सरस्वती मातेवर जीवापाड भक्ती करु लागलो. 

          आमच्या वर्गातील एक मुलगा आठवड्यातून एकदा तरी ' फिट ' येऊन जमिनीवर पडत असे. त्यावेळी आमच्या साटमबाई ' सरस्वतीची ' उदी ' त्याच्या छातीला लावत. तो दोन मिनिटात उठून व्यवस्थित झालेला आम्ही कित्येकदा पाहिला आहे. आमची देवीवर श्रद्धा होतीच, पण या घटनेमुळे आमची तिच्यावरील श्रद्धा अधिक दृढ होत गेली. 

          आता मी शिक्षक असल्याने सरस्वती मातेच्या सातत्यपूर्ण सानिध्यात असल्याने तिचे दैनंदिन वरदान लाभते आहे ही जमेची बाजू आहे. आमच्या शिडवणे नं. १ शाळेत दरवर्षीप्रमाणे ' शारदोत्सव ' उत्साहात साजरा करण्यात आला होता. 

          त्यानिमित्ताने सर्व मुलांना सरस्वती मातेची प्रतिमा रंगविण्यास दिली होती. खरंच सांगतो, मुलांना दिलेला उपक्रम खूपच आवडला. सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने देवीचे चित्र रंगवून आणले होते. त्याच चित्राचे पूजन केले. त्याच चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. पालकांनी चित्रे पाहिली. आपली मुले चित्र इतकी छान रंगवू शकतात, याबद्दल त्यांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमानच वाटला. हा अभिमान मी प्रत्येक पालकांच्या डोळ्यात पाहत होतो. सरस्वतीच्या चित्राच्या वरच्या बाजूला ' शारदे हवे तुझे वरदान ' असे वाक्य छापले होते. त्यामुळे प्रत्येक मूल ते वाक्य वाचून आपल्या विद्येच्या आराध्य दैवताला ' वंदन ' करताना दिसत होते. सुंदर चित्र रंगविणाऱ्या मुलांना जलरंगांची सप्रेम भेट देण्यात आली. इतर सर्वांना रंगीत खडुची पेटी मिळाली.  चित्रकलेला आणि भक्तीला प्रोत्साहन मिळाले. 

          मुलांनी ' सर्वमंगल मांगल्ये ', ' नमस्ते शारदा देवी ' अशी सरस्वती स्तवने म्हटली. मुलांचा, शिक्षकांचा, पालकांचा आणि उपस्थित सर्वांचा आनंद मी टिपत चाललो होतो. सर्वांचा ' सरस्वती ' साठीचा हा एक दिवस अविस्मरणीय ठरला होता. मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, सरस्वती मातेच्या सहवासात राहण्यासाठी तुम्हांला सतत अभ्यास करत राहायला हवे, तर श्रीदेवी शारदामाता तुमच्यावर सदैव वरदहस्त ठेवेल यांत अजिबात शंका नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Tuesday, October 8, 2024

माझा कब बाळ, गुणाचा गं

 माझा कब बाळ, गुणाचा गं 

          नमस्कार मुलांनो, आपण गेल्या आठवड्यात भेटलो होतो. कसे आहात ? तुम्ही ना माझे सिंहाचे छावे आहात. छावा म्हणजे इंग्रजीत कब ( Cub ) बरं का !!! त्यामुळे तुम्ही नेहमीच काहीतरी धडपड करत असणार हे मला पूर्ण माहित आहे. कारण मी स्वतः तुमचा कबमास्टर आहे. त्यामुळे तुम्हाला घडवत असताना मला खूप महत्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तुम्ही मुले माझे विद्यार्थी असता, तेव्हा मी शिक्षक असतो. पण तुम्ही ' कब ' बनता, तेव्हा मी तुमचा ' कबमास्टर ' बनून तुमच्यात असतो. मला तुमच्यासोबत मौज, मस्ती करायला खूप आवडतं. तुम्ही माझे लाडके आहात, तसाच मीही तुमचा लाडका असेन असे मला तरी वाटते. 

          मित्रांनो, गेले दोन दिवस मी माझ्यासारख्या शिक्षकांना ' कब ' चे प्रशिक्षण द्यायला कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात गेलो होतो. तुमच्या कबमास्टरांशी गप्पा, गोष्टी, गाणी आणि खेळ याविषयी बोलताना मला झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. तुम्हाला लाभलेले हे सर्व कबमास्टर शिक्षक शिक्षिका अतिशय प्रेमळ आहेत. तुम्हाला लोभ लावणाऱ्या आहेत. तुमचे गुरुजी, बाई किंवा टीचर किंवा सर, मॅडम असं संबोधन लावून तुम्ही त्यांना आदरपूर्वक हाक मारत असाल ना ? तुम्ही जेव्हा प्रेमाने जवळ येऊन हाक मारता तेव्हा आमचा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो. तुमच्या समस्या न घाबरता सांगताना तुम्ही संकोच करत नसाल, तर तुम्ही एक चांगली गोष्ट करत आहात. एखादे वेळी घरी आईबाबांशी तुम्हाला एखादी गोष्ट कशी सांगू असं वाटत असेल, पण तुमच्या बाई, गुरुजींकडे तुम्ही सहज बोलून मोकळे होता तुमची समस्या !!! तेव्हाच आमच्या या शिक्षकी पेशाची उंची अधिकाधिक वाढत जाते आणि जबाबदारीही वाढते. कारण तुम्ही तुमची समस्या सांगून तुम्ही तुम्हाला आमच्या स्वाधीन करुन टाकलेलं असतं. तुमचा आमच्यावर असलेला हा विश्वासच आमचा पुरस्कार असतो हे सांगताना मला अधिक अभिमानच वाटतो. 

          मी तुमच्यासाठी एक साधा प्राथमिक शिक्षक आहे. तुमच्या सोबत मला अनेक दिवस अतिशय आनंदात घालवायची संधी प्राप्त झालेली आहे. मला या संधीचं सोनं करायचं आहे. आता दसरा येईल, एक दिवस सोनं लुटायला मिळेल. मी तर तुमच्यासोबत दररोजच ' आनंदाचं सोनं ' लुटत आलोय याची तुम्हाला कल्पनाही नसेल. मी आता तुमचा ' कबमास्तर किंवा कबमास्टर ' बनलो आहे. तुम्ही माझे कब बाळ आहात एवढंच मला माहिती आहे. तुमच्यासाठी मला स्वतःला सतत वाचन करत राहायला हवं, नवनवीन गाणी संग्रहित करायला हवीत, ती पुन्हा म्हणून तुमच्याकडूनही म्हणवून घ्यायला हवीत. रोज एकतरी गाणं तुम्हाला सांगण्यासाठी मला जी शोध मोहीम राबवावी लागते, त्याचा मला लागलेला ध्यास तुमच्यावरच्या प्रेमातूनच आलेला आहे. या गाण्यांमधून जे शब्द ऐकायला मिळतात, त्यातूनही तुम्हाला विविध नवनवीन माहिती मिळत राहते. शब्दसंग्रह वाढतो. यमक शब्द सुचतात. कवी मन तयार होतं. गाणी म्हटल्याने तुमची एकाग्रता वाढते. गाणी तुमच्या सहज पाठ होतात, अर्थात तुमची स्मरणशक्ती वाढते. गाण्यांसोबत तुम्ही लय, ताल, सूर शिकता. अर्थात संगीत शिकता. आवाजात बदल करत असताना तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करावं लागतं. तुमच्याकडून अनेक उत्तम गोष्टी घडत राहतात आणि तुम्ही आहात त्यापेक्षा चुणचुणीत गुणी बाळं बनत जाता. तुम्हाला योग्य आकार देण्याचं कार्य करणारे आम्ही ' कबमास्टर ' आहोत. 

          कब बाळांनो, दोन दिवस स्काऊट गाईड कब बुलबुल उजळणी वर्गाच्या निमित्ताने मला ' कबमास्टर ' आणि ' लेडी कबमास्टर ' यांना मार्गदर्शन करण्याची सुसंधी लाभली होती. त्यामुळे मी दोन दिवस तुमच्यात नव्हतो. तरीही मी तिथे तुमचीच आठवण काढत होतो. तुम्ही माझी गुणी बाळं आहात, तुम्ही अधिक गुणसंपन्न व्हा म्हणजे ' कबमास्टर ' म्हणून माझा आनंद गगनात मावेनासा होईल. 


प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...