श्यामची आई हा चित्रपट बालपणी पाहिला होता. त्यात आईच्या मायेची थोरवी सांगण्यात सानेगुरुजींनी शब्दांमध्ये जणू प्राणच ओतले आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ' श्यामची आई ' या पुस्तकाला ' पवित्र मंगल स्तोत्र ' म्हटले आहे.
कारागृहात बेचाळीस रात्री गोष्टी सांगत असताना त्यांच्या मुखातून आईच्या मायेचा हा सागर ओसंडून वाहत होता. त्यांच्या डोळ्यांतून त्यावेळी अश्रूंचा महासागर वाहत असेल हे वेगळे सांगायला नको.
आजही ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचताना प्रत्येकवेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले पाहिजेत अशी ही आईवरील निर्व्याज प्रेमाच्या अश्रूंनी लिहिली गेलेली कादंबरी विरळीच म्हणायला हवी.
शाळेत पहिलीत प्रवेश घेणारी मुले शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्या आईचं बोट सोडायला तयार होत नसतात. शाळेत स्थिरावली तरी त्यांचं अधिकचं लक्ष घरी आईकडेच लागलेलं असतं. शाळेतील बाईंमध्ये जेव्हा ही मुले आपल्या आईचं रुप पाहतात , तेव्हा कुठे त्यांना थोडाफार आईचा विसर पडत असेल.
तरीही शाळा सुटण्याच्या वेळी आईची वाट पाहत बसलेली आणि आई दिसली की वायुवेगाने आईच्या दिशेने धावणारीही मुले पाहिली आहेत. एवढी असते प्रत्येकाला आपल्या आईची ओढ. आपली आई अजून आपल्याला न्यायला आली कशी नाही ? हा प्रश्न पडताच डोळ्यांतून गंगा यमुना आपोआप वाहायला लागतात ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडली असेलच.
मुले मोठी होत असली तरी आई मोठी होत नाही. घरी जाताच आईला कडकडून मिठी मारणारी मुले पाहिली की परत लहान व्हावंसं वाटतं. लहान असतानाचे तिच्यासोबतचे हृद्य क्षण आठवतात आणि तिच्या प्रेमाने व्याकुळ व्हायला होतं. डोळ्यातून हलकेच पाणी तरळतं. मायेच्या सागराला जणू भरती येते.
शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत होते. एक दुसरीतील आठ वर्षांची मुलगी ' एकल गीत ' म्हणण्यासाठी रंगमंचावर आली. मी सूत्रसंचालक होतो. मुलीने आपले गाणे म्हणायला सुरुवात केली. तिच्या मधुर आवाजाने सर्व प्रेक्षक शांत झाले. गाण्याचे बोल असे होते.
" आई माझी मायेचा सागर
तिने दिला जीवना आकार
आई वडील माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
जीवनाच्या वाटेवरती
किती असतो त्यांचा आधार "
याही पुढे आईच्या मायेची महती सांगणारे शब्द काव्यरूपाने तिच्या मुखातून बाहेर पडतच होते. मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द ती स्वतः जगत होती. तिची आई तिच्या समोरच प्रेक्षक म्हणून बसली होती. मुलीचं गाणं इतकं हळवं होतं , की ती मुलगी स्वतः हुंदके देत पुढची कडवी म्हणत होती. मलाही गहिवरुन आलं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या पाठीवर आश्वासक हात ठेवला. तिचे गाणे संपेपर्यंत मी कमालीचा निःशब्द झालो होतो. माझी आई मला काही क्षणासाठी माझ्या पाठीवर स्पर्श करुन गेल्याचा भास झाला.
©️ प्रवीण अशितोष कुबल
पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ ( कणकवली )
