Monday, September 16, 2024

🛑 चिंतन हा चिंतामणी

🛑 चिंतन हा चिंतामणी

          गणेश चतुर्थीला आपल्या चिंतामणीचं दर्शन आपल्याला घडलं आहे. सर्व चिंतांना दूर पळवणारा हा चिंतामणी. हा लेख वाचेपर्यंत तुम्हां मुलांची ' गणेश चतुर्थी सुट्टी ' नंतर शाळा सुरु झालेली असेल ना ?

          नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे ? चिंतामुक्त झालात ना ? शाळा सुरु झाली म्हणून चिंताग्रस्त तर झाला नाहीत ना ? तशीही शाळा तुम्हाला खूपच आवडते म्हणा. गणपती जसा आवडीचा, तशी शाळा तुमच्या लाडकीची म्हणायला हरकत नाही. 

          आज आपण आपलं चित्त एका वेगळ्या गोष्टीकडे केंद्रीत करणार आहोत. आपण ' चिंतन ' करणार आहोत. आपल्या गणपतीला ' चिंतन ' करायला खूप आवडे. आपण त्याची ही सवय जोपासुया. चिंतन करायला हवं म्हणजे नेमकं काय करायचं ? हा प्रश्न तुम्हाला पडणार हे मला माहिती आहे. 

          तुम्ही एखादी गोष्ट करता म्हणजे काय करता ? ती करण्यापूर्वी विचार करता. हा विचारच तुम्हाला एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यासाठी प्रेरित करीत असतो. तुम्ही कितीतरी गोष्टी करत असता. ती चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल. पण ती चांगली नाही असे तुम्हाला नंतर कळते. मोठी माणसे तुम्हाला त्याची जाणीव करुन देत असतात. त्यावेळी तुम्हाला रागही येतो. कारण तुम्ही केलेली गोष्ट तुम्हाला बरोबर आहे असे वाटणे साहजिकच असते. ती खरंच चुकीची होती किंवा बरोबर होती याचा तुम्ही सारासार विचार करु लागता, तेव्हा तुम्ही जो विचार करत असता, ते म्हणजे ' चिंतन ' असते. 

          आज आणि सतत हे चिंतन करणे खूप गरजेचे बनले आहे. कारण या चिंतनाने तुम्ही स्वतःच स्वतःचे मूल्यमापन करत असता. स्वतः स्वतःचे मूल्यमापन करणे कधीही चांगले असते. कारण तुम्ही तुमच्या वाईट सवयी घालवण्यास स्वतःच स्वतःला मदत करत असता. बघा, तुम्हाला नक्की जमेल.

         " प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे " या सुवचनानुसार तुम्ही सतत प्रयत्नांची कास धरुन चाला तरच तुमचा कस लागेल. तुमच्या चिंता दूर करणारा चिंतामणी तुमच्या सोबत आहेच. तुम्हाला चिंता सतावू नये. तुम्ही तिचा अजिबात बाऊ करायचा नाही. चिंतेने चिंताग्रस्त व्हायचे नाही. त्रयस्थपणे विचार करायचा. चिंतन करुन त्यातून सन्माननीय मार्ग काढायचा. स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनायचे. तुम्हाला मार्ग सापडताना दिसेल तेव्हा तुम्हाला जो आनंद झालेला असेल, त्याचे वर्णनही तुम्ही करु शकणार नाही. 

          लहानपणी मी रेडिओवर ' चिंतन हा चिंतामणी ' नावाचा कार्यक्रम नेहमी ऐकत असे. त्याचा मला खूपच फायदा झाला. आता तुमच्याकडे रेडिओ नसेल हे मला माहिती आहे. कारण त्याची जागा आता मोबाईलसारख्या यंत्राने घेतली आहे. त्याचा उपयोग जरुर करा, पण त्याच्या आहारी अजिबात जाऊ नका. नाहीतर त्यावर ' चिंतन ' करा आणि त्यावर तुमचं काय मत तयार होतं ते लिहून काढा. माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही खूप चांगली मुलं आहात, अधिक चांगली व्हा. मला तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Saturday, September 7, 2024

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१


Tuesday, September 3, 2024

🛑 आधी गणाला मनी साठवावा

🛑 आधी गणाला मनी साठवावा


          गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले कि सगळ्यांचीच लगबग सुरु होते. मुलांना सुट्टी पडणार म्हणून मुले खुशीत असतात. आकारिक चाचणी पहिली पार पडलेली असते. शाळेत विविध उपक्रम सुरुच असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची रस्सीखेच सुरु झालेली असते. 

          मुले घरातील सजावटीत रमलेली असतात. भिंतीना रंग, सफाई, मखर बनवणे, गणेशमूर्ती बघायला जाणे अशी कामे मुलांची आवडीची. अभ्यासापेक्षा मुले यात जास्त रमतात. त्यात त्यांना आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलेली असते. कधी एकदा तो दिवस येतो असे त्यांना झालेले असते. तबला, डग्गा, सुरपेटी, ढोलकी, मृदूंग आणि चकी ( झांज )  यांना बाहेर काढण्यात येते. खूप दिवसानंतर आपल्यावर थाप बसणार म्हणून वादयेही खुशीत वाजू लागतात. 

          घरातलं वातावरण पूर्ण उत्साहाच्या धबधब्यांनी  न्हाऊन निघतं. मुंबईची मंडळी नेहमीच दोन दिवस अगोदर येतात. त्यांची ' मुंबईची बोली ' घरोघर घुमू लागते. मराठी आणि गावाकडच्या मिश्र भाषेने गप्पा रंगून जातात. चाकरमानी आल्यामुळे गावाकडले म्हातारेशितारे पुन्हा तरुण बनून कामात हातभार लावू लागतात. 

          पताका कापून त्या लावण्यातील मज्जा काही औरच असते. सर्व भिंतीवर कॅलेंडरे झळकू लागतात. गणपतीची खोली हा हा म्हणता सजून जाते. बाप्पासाठी आरास करताना अजिबात कंटाळा येत नाही. अंगातील आजारपण कुठल्या कुठे निघून जाते.

          छतांवर रंगीबेरंगी पडदे झुलू लागतात. बघावं तिकडे पाहत राहावं असं वातावरण असतं. एवढं प्रसन्न चित्त होण्यासाठी फक्त एकमेव ' गणपती बाप्पा ' कारणीभूत असतो. 

          हौशी भजन मंडळे तयारीला लागतात. त्यांची रंगीत तालीम सुरु झालेलीच असते. एकापेक्षा एक उडत्या चालीवर गाणी बसविण्याची जणू स्पर्धाच सुरु होणार असते. गणपतीवर कित्येक गाणी रचली जाण्याचा काळ असतो हा. सारेजण गणपतीमय होऊन जातात. जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्यावर मात करायला शिकवणारा प्रत्येकाचा ' माझा बाप्पा ' तनमनात येत राहत असतो. 

          चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. आपल्या बाप्पाचं आगमन प्रतिवर्षी हवंहवंस वाटणारं असंच असतं. घरातील मुलेमाणसे गणपतीसाठी एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना पाहून थोरामोठ्यांची छाती फुलून येते. आरत्या, भजने आणि खाद्यपदार्थांची रेलचेल सुखावून जाते. माणसे तनाने आणि मनाने सुद्धा अधिकाधिक जवळ येऊ लागतात. 

          गणपतीसाठी आतून आतुर झालेली माणसे पाहून हा गणेशोत्सव कधी संपूच नये असं वाटत राहत असतानाच त्याच्या विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून पाणी तरळते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, " आधी गणाला मनी साठवावा " 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १











Thursday, July 25, 2024

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव 


         सध्याचे जीवन अतिशय धकाधकीचे, स्पर्धेचे आणि अतीतणावाचे झाले आहे. तणावाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्याशिवाय दिवस संपतही नाही. या तणावांचा सामना मोठ्यांनाच नव्हे तर लहानांना देखील करावा लागत आहे. सुट्ट्या पडल्या तरी हा तणाव त्यांची पाठ सोडत नाही. काहीवेळा थोडा तणाव हा जीवनावश्यक असतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वजण तंत्रस्नेही बनत चालले आहेत. जेवढे तंत्रस्नेही बनतील तेवढे त्यांचे तणाव वाढतील. तंत्रस्नेही बनणे जरुरीचे असले तरी त्यामुळे माणसांची जीवनशैली बदलत चालली आहे. 

कित्येक तास मोबाईलवर , लॅपटॉपवर किंवा टॅबवर अभ्यास करणारी मुले पाहिली कि त्यांची खरंच चिंता वाटू लागली आहे. विविध आभासी गेम्स खेळणारी मुले पाहूनही त्यांच्या भावी जीवनाचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही. एकूणच काय आपल्या दैनंदिन जीवनाचे ‘ मिशन लाईफ ’ भरकटत चालले आहे. ही भरकटणारी जीवन नौका व्यवस्थित पैलतीरावर आणावयाची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला पर्यावरणाविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे झाले आहे. 

म्हणूनच की काय शासनाने ‘ उन्हाळी शिबीर ’ ही संकल्पना आणलेली असू शकते. मुलांना सुट्टी असताना ५ जून ते ११ जून असे सात दिवस सात थीम्स घेऊन ही संकल्पना उपक्रमस्वरुपात राबवणे असा शासन आदेश आहे. हे शिबीर राबविण्यात अनेकांना अडचणी आलेल्या असू शकतात. पण शाळा सुरु झाल्यानंतर सुद्धा आपण या परिपत्रकाचा आधार घेऊन यावर्षी शालेय दिवसांमध्ये किंवा पुढील मोठ्या सुट्ट्यांमध्ये असे पर्यावरणप्रेमी उपक्रम राबविल्यास मुलांना ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास नक्कीची मदत होऊ शकते असे वाटते. 

सुट्ट्या पडल्या की मुलांचे काय करायचे हा यक्ष प्रश्न प्रत्येक पालकांना पडत असतो. मी शिक्षक असलो तरी मी पालक म्हणून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मलाही तसेच वाटते. ग्रामीण भागातील मुले सुट्टीच्या काळात शहरात जातात. शहरी भागातील मुले आपल्या गावाकडे सुट्टीचा आनंद घ्यायला जातात. कदाचित हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे उन्हाळी शिबीरच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पण त्यात नियोजनबद्धता नसते. त्यात विविध मर्यादा पडतात. सुसंस्कार होतील याची गॅरंटीही नसते. त्यामुळे जे पालक आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करू शकतात , ते पालक आपल्या मुलांना अशा खाजगीत होणाऱ्या उन्हाळी शिबिरांना पाठवतात. तिथे मुलांना स्वतःची कामे स्वतःच करावी लागतात. मुलांचा पूर्ण दिवस वेळापत्रकाप्रमाणे आखलेला असतो. कधी काय उपक्रम करायचा हे लेखी स्वरूपात लिहिलेले असते. खाणे , पिणे , हुंदडणे आणि बरेच काही घड्याळाच्या काट्यावर चाललेले असते. सर्वसामान्य मुलांच्या पदरात या गोष्टी पडतच नाहीत. त्यांना घरची कामे करावी लागतात. सुट्ट्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी पोषकच असतील हे सांगता येत नाही. तरीही ही मुले सुट्टीचा आनंद घेतातच. आपल्या जवळच्या आजोळी जाऊन मामाच्या घरी आनंद घेणारी मुले मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मी स्वतःही अशा अनियोजनबद्ध शिबिराचा आनंद घेऊन मोठा झालो आहे. पण पालक झाल्यानंतर माझी मुले नियोजनबद्ध उन्हाळी शिबिराचा भाग बनावीत असे मला कित्येकदा वाटले आहे. पण मी काही माझ्या मुलांना शिबिरांचा लाभ देऊ शकलेलो नाही. 

आजच्या शिक्षकांना दररोज विविध उपक्रम राबविण्याचा तणाव नक्की येत असेल. तरीही आपल्याला जमेल तसे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करताना दिसत आहेत. उपक्रम राबवले म्हणजे आपण यशस्वी होत नसतो. त्यांची फलनिष्पत्ती दिसली कि आपल्याला लाखमोलाचे समाधान वाटत असते. आजची मुले जीवनात पुढे यशस्वीपणे झुंज देण्यासाठी सक्षम बनविण्याची बिजे या उपक्रमांत असतात. आपल्या मुलांची ही पिढी भावी आयुष्यात सकारात्मकतेने , सुदृढतेने जीवन जगताना दिसतील तेव्हाच आपल्या उपक्रमांना यश मिळाल्याचे लक्षात येईल. 

त्यासाठी मुलांनी निसर्गावर प्रेम करायला शिकायला हवे. निसर्गफेरी आयोजित करून आपण त्यावर काही प्रमाणात मात करू शकतो. परिसरात झाडे लावून त्यांचे जतन करताना मुलांचे वृक्षप्रेम जागृत होईल. आपल्या जवळपास पर्यावरणप्रेमी क्षेत्रभेटी आयोजन करत असताना मुले भावी उद्योजक बनू शकतात. ही पहिल्या दिवसाची थीम आहे. 

शाळेत पोषण आहार सुरु आहे. त्यात शाळेत पिकविलेल्या भाज्या शिजवून देताना त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल. परसबागेचे उपक्रम त्यासाठीच तर आहेत. जेवल्यानंतर उरणारे अन्न किंवा कचरापेटीत टाकावयाचे अन्न म्हणजे ओला कचरा आहे. त्याचेही व्यवस्थापन त्यानिमित्ताने मुलांना समजावे हा हेतू आहे. मुलांनी हा ओला कचरा स्वतः शोषखड्ड्यात टाकावा , त्याचे बनलेले कंपोस्ट खत आपल्या परसबागेत वापरता येते. ही जी जीवनशैली आहे ती खरी आरोग्यशैली आहे याची ओळख या अशा इको क्लबमधून दिल्यास अधिक उत्तम होईल.ही दुसऱ्या दिवसाची थीम आहे. 

सध्या शाळेमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यांच्या सततच्या वापराने ती खराब होत असतात. त्यामुळे तो सुद्धा एक कचराच होतो. त्याचा कसा निचरा करावा हेसुद्धा मुलांना या तिसऱ्या दिवसाच्या थीममधून सांगणे अपेक्षित आहे. त्यासाठी अशा कचऱ्याचा विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांशी संपर्क करणे ही पुढील काळाची गरज असणार आहे हेही मुलांना समजाविता आले तर त्याचाही मुलांना पुढील जीवनात फायदाच होणार आहे. 

शालेय जीवनात परिपाठापासून सफाई कामाला सुरुवात होते. मोठ्या शाळेमध्ये परिसर मोठा असतो , त्यामुळे सुका कचरा जास्त असतो. पोषण आहार योजनेत ओला कचरा निर्माण होतो. दोन्ही कचऱ्याचे व्यवस्थापन मुलांना शिकविले गेले पाहिजे. त्याचा उपयोग ही मुले आपल्या घरी देखील करतील. कचरा व्यवस्थापन केल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असतात. या टाकाऊ वस्तू सुद्धा काहीवेळेला टिकाऊ करण्याची क्षमता मुलांमध्ये आणली जाऊ शकते. मुले कल्पक असतात , त्यांना हे काम दिले कि मुलांच्या विचारचक्राला चालना मिळते. मुले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून विधायक कार्य करण्यास प्रेरित होतात. पुढील आयुष्यात त्यांना अशा अनेक संकटांना तोंड देताना या कौशल्याचा उपयोग हमखास होणार आहे. ही चौथ्या दिवसाची थीम आहे. 

पाचव्या दिवशी मुलांची ‘ ऊर्जा समिती ’ स्थापन करावयाची आहे. अक्षय ऊर्जा या विषयावर मुलांना एखादे प्रबोधनपर व्याख्यान देता आले तर नक्की आयोजन करावयाचे आहे. सौर ऊर्जेचा वापर करुन आपली कामे मार्गी लावता येतात हेही त्यांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. शाळेमध्ये सौर ऊर्जा पॅनल देखील असू शकतात. त्यांचा वापर करुन आपण एक प्रकारे ऊर्जेची बचतच करत आहोत हेही मुलांना समजू शकेल. ऊर्जा संवर्धनाकरिता मुलांची पोस्टर स्पर्धा देखील आपण आयोजित करू शकतो. 

शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. पाणी हे जीवन आहे. ते कमी असताना किंवा टंचाई असताना आपण ते जपून वापरतो. परंतु ते मुबलक प्रमाणात असले तरीही ते जपूनच वापरले पाहिजे ह्या सवयी मुलांच्या अंगी रुजविणे यातून शक्य होऊ शकते. शुद्ध , अशुद्ध पाणी आणि जलसंधारण विषयक मार्गदर्शने आयोजित करता येऊ शकतात. ही सहाव्या दिवसाची थीम आहे. 

शाळांमध्ये हल्ली प्लास्टिक पिक अप डे साजरे केले जातात. प्लास्टिक कचरा ही पर्यावरणाची फार मोठी समस्या आहे. मुलांनी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरता किंवा त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भावी जीवनात जागृत व्हावे हा यामागील हेतू आहे. मुलांनी जाणीवपूर्वक प्लास्टिकरहित वस्तूंचा कायम वापर करावा अशा सवयी लावता आल्या तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शाळेत पोस्टर मेकिंग स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , घोषवाक्ये स्पर्धा इत्यादी घेता येऊ शकतात. 

ही या उन्हाळी शिबिरातील सातव्या दिवसाची थीम आहे. 

अर्थात असे सप्ताह किंवा शिबिरे आयोजित करुन मुलांच्या , पालकांच्या आणि समाजाच्या मनात विविध समस्यांची जाणीव निर्माण करुन देणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे काम आहे. हे काम निरंतर करणे ही खरी गरज आहे. पण याद्वारे जागृत झालेली मुलांची मने पुढे अधिक समृद्ध आरोग्यदायी पिढी घडवतील अशी आशा बाळगूया. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ 


मार्गदर्शक : शिक्षण परिषद , २५ जुलै २०२४ : केंद्र शेर्पे व खारेपाटण 



 

Saturday, July 13, 2024

🛑 एक स्वानंदी शनिवार

🛑 एक स्वानंदी शनिवार

          शाळांमध्ये सध्या दर शनिवारी ' आनंददायी शनिवार ' नावाचा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. दप्तराविना शाळा आणि आनंददायी शनिवार निमित्त शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, आरोग्यदायी, कृतियुक्त आणि तणावरहित वातावरणात अनुभव देण्याचा शासनाचा उपक्रम खरंच स्तुत्य म्हणायला हवा. 

          आमच्या शाळेत या उपक्रमांची सुरुवात झाल्याचे माझ्या छोट्या मुलीला कळले. तिला मी सहजच बोलून गेलो, " उर्मी, मी तुला कधीतरी माझ्या शाळेत घेऊन जाणार आहे. तू छान हावभाव करुन गोष्टी सांगतेस. आमच्या शाळेतील मुलांना तू सांगितलेल्या गोष्टी आवडतील. " मी सांगितल्यावर ती तर माझ्या खनपटीलाच बसली. नुसता शाळेत येणार म्हणून घोषाच लावला. मग काय ? येत्या शनिवारी मी तुला शाळेत नेईन असे प्रायोगिक तत्वावर सांगून टाकले. मला वाटले ही मुलगी विसरून जाईल. पण तिने तयारी करायला सुरुवातही केली होती. एका संध्याकाळी तर  ती आरश्यासमोर राहून एकटीच कथा सांगण्याचा सराव करताना मला दिसली. 

          आज तो दिवस उजाडला. बाहेर पाऊस तुफान बरसत होता. एवढ्या पावसातून तिला तीस किलोमीटर वरील शिडवणे नं. १ शाळेत नेणे मला तर जीवावरच आले होते. पण ती आपल्या स्वतःच्या शाळेतील वर्गशिक्षिकांची परवानगीसुद्धा घेऊन आली होती. ती गाढ झोपली होती. तिला थोडेसे हलवून जागे केले. ती लगेच उठून बसली. तयारीला लागली. अर्ध्या ते पाऊण तासात तिची तयारी झालीसुद्धा. 

          पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. आम्ही बापलेक रेनकोट घालून पावसाशी सामना करत शाळेकडे निघालो. ती माझ्या बाईकवर मागे घट्ट मिठी मारुन बसली होती. ती नीट बसली असली तरी मलाच तिच्या सुरक्षेविषयी भीती वाटू लागली होती. पुन्हा बाबा आणि पत्नी दोघांनीही मला तिच्या सुरक्षेविषयी पुन्हा पुन्हा बजावून सांगितले होतेच. थोडे पुढे गेल्यावर मी तिला माझ्या पुढेच बसायला सांगितले. ती बसली. तिला तशी बसायची चांगलीच सवय आहे. 

          पण पावसाचे मोठे थेंब तिच्या तोंडावर बसत होते. गाडीचा वेग वाढे, तसे पाऊस मोठ्यांदा कानपटीत मारल्यासारखा करत असे. पण ती कथा सांगण्याच्या उत्साहात होती. त्यामुळे तिला होणारा त्रास तिने मला अजिबात जाणवू दिला नाही. जवळ जवळ एक तासाचा प्रवास तिला छोटीला भर पावसात त्रासदायक होता हे कोणीही मान्य करेल. 

          ती जात्याच स्टोरीटेलर आहे. तिच्या दोन्ही मोठ्या बहिणी सेम तश्याच आहेत. त्यांच्याकडून तिला हा वारसा मिळाला असावा. तिन्ही मुली एकत्र असल्यावर त्यांच्या गप्पागोष्टींना कधीही अंत नसतो. मी ओरडल्याशिवाय त्यांचं बोलणं थांबत नसतं. लहानपणापासून मी त्यांच्याशी प्रमाणभाषेत बोलत आलोय. त्यांना ओरडतानासुद्धा मी प्रमाणभाषा सोडत नाही. गावी गेली की ह्या मुली ' मालवणी भाषा ' सुद्धा शुद्ध बोलतात. म्हणजे अस्सल बोलतात असे मला म्हणायचे आहे. 

          तिचे कपडे भिजले म्हणून शाळेत गेल्यागेल्या शाळेतील बाईंनी तिला कपडे बदलायला मदत केली. तिला नीट पुसून काढले. पाच मिनिटांत मी फलकलेखन केले. ' गोष्टींचा शनिवार : आनंददायी शनिवार ' उपक्रम सुरु केला. माझी मुलगी कुडकुडत होती. पण कथाकथन करण्याचा जोश कायम होता. 

          तिने आपल्या कथाकथनाला तिच्या शैलीत सुरुवात केली. तिचे दात थंडीने एकमेकांवर आपटत होते. पण तिने जिद्द सोडली नाही. एकापाठोपाठ एक करत तिने सलग पाच कथांचे हावभावयुक्त सादरीकरण केले. मुलांचे आणि शिक्षकांचेही लक्ष अजिबात ढळू दिले नाही. ते तिचे स्टोरी टेलिंगचे कौशल्यच म्हणायला हवे. 

          गोष्टींचा तास संपल्यावर सर्व मुलांच्या गगनभेदी टाळ्यांनी ती पुरती भारावून गेलेली दिसली. मीही बोलता बोलता तिच्या काही गोष्टी सांगताना हळवा भावनाविवश झालो असताना तिच्याही डोळ्यात पाणी तरळले होते. स्वानंदीने खऱ्या अर्थाने सर्वांचा शनिवार निखळ आनंदी बनवला होता. ती स्वतः देखील शाळेतून घरी येताना मला म्हणाली, " पप्पा, मी आज खूप खूप आनंदात आहे. इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. " 

          मी गाडी चालवत होतो. ती पुढे बसली होती. माझ्या डोळ्यात आलेले पाणी अजिबात थांबू पाहत नव्हतं. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Friday, July 12, 2024

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

          मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून गावाकडे शिकलेल्या माहेरवाशिणी आमच्या शाळेकडे येऊ लागल्या आहेत. शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी शाळेत रोजच या बहिणी किंवा त्यांचे भाऊ, वडील, आई अशी मंडळी येतात तेव्हा खूप आनंद होतो. आनंद याच्यासाठी कि कधीतरी पासष्ट वर्षांपूर्वी शिकायला शाळेकडे आलेल्या आजीबाईसुद्धा आपला दाखला मागायला येत आहेत म्हणून. 

          त्यांच्या वेळचे ते शिक्षक त्यांना आठवत असतील का ? एवढे बोलायलाही तसा वेळ नसतोच, पण आमच्या शाळेला त्यांचे पाय लागत आहेत हे आमचे भाग्यच. आम्हांला काय फक्त एक आणि एकच दाखल्याचा कागद त्यांच्या हाती सोपवायचा असतो. तो सोपवताना आम्ही जी सेवा देतो आहोत, ते पाहून त्यांच्या डोळयांतील कृतज्ञतेचे भाव बघताना जणू आपले नातेवाईक भेटल्याचा भास होतो आहे. या योजनेमुळे शाळेकडे येणारी माणसे दररोज कमीत कमी चार तरी येतच आहेत. 

          आता आमचे काम वाढले आहे हे नक्की. तरीही ते करताना कोणताही थकवा येत नाही हे विशेष. पूर्वी कुणी दाखला मागायला आले कि तो बनविण्यासाठी मोठे कष्ट पडत नसत. मोठ्या शाळेत खूप जुने रेकॉर्ड असते. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म झालेल्या आजोबा आजींचे दाखले नेण्यासाठी लोक आठवड्याला दोन तरी येतच असतात. या गोष्टीची आम्हाला सवयच झाली आहे म्हणा ना !!!

          शाळा सोडल्याचा दाखला बनवणे तशी वेळकाढू गोष्ट असते. मागणी घ्या, प्रतिज्ञापत्र बनवा, सात ते आठ रजिस्टरांमध्ये नाव शोधा असे काम असते. एकदा नाव सापडले कि दाखला बनवायला दहा ते पंधरा मिनिटे पुरेशी होऊ शकतात. पण अभ्यागतांकडून जन्मतारीख नीट समजू शकली नाही तर अंदाजाने वय आणि जन्म यांचा मेळ घालत जीर्ण झालेल्या जुन्या जनरल रजिस्टरांमध्ये डोके खुपसताना नाव सापडले कि कोण आनंद होतो म्हणून सांगू ? जो दाखला मागायला आलेला असतो त्याचा चेहरा त्यावेळी बघायला हवा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिला आहे. 

          काही सरकारी कार्यालयात एखादा मागणी केलेला कागद मिळण्याचा कालावधी लिहून ठेवलेला असतो. त्यामुळे तिथे तितके दिवस कागद मिळण्यासाठीचा संयम पाळावाच लागतो. मात्र शाळेत असे दाखले लवकर दिले जातात असा माझा अनुभव आहे. तिथे दिवसांचा कालावधी दिलेला आहे का अभ्यासावे लागेल. 

          आलेली माणसे आपल्या ओळखीची असोत किंवा नसोत, दाखले तयार करुन देणे आपले कर्तव्यच असते. ही मंडळी आली की त्यांना थांबायला सांगून अध्यापनाची कामे करणे जीवावर येत असते. कधीतरी हातातले सुरु असलेले काम हातावेगळे करेपर्यंत थांबा अशी नम्र विनंती केली तर लोकं नक्की थांबतात. एक काय दोन दोन तास सुद्धा थांबून दाखला नेणाऱ्या मंडळींची चिकाटी उल्लेखनीयच म्हणायला हवी. अर्थात कधीतरी दाखला द्यायचाच असतो, तर तो आजच दिला तर ? तर आलेली व्यक्ती आनंदी होऊन जाताना दुवा देऊनही जात असावी. 

          आज मी आणि माझ्या शाळेतील तिन्ही शिक्षिकांनी शालेय अध्यापन , पायाभूत चाचणी, केंद्रप्रमुख भेट, पोषण आहार, फुलझाडे लागवड, उद्या होणाऱ्या बांधावरच्या शाळा उपक्रमाची पूर्वतयारी आणि आलेल्या नऊ लाडक्या बहिणींचे दाखले देऊन कामांचा सिक्सरच मारला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

          या सर्व लाडक्या बहिणींना या नव्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अजून उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हा त्या आनंदाची बेरीज होईल. आमच्या शाळेकडे येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थिनी, माहेरवाशिणी आणि लाडक्या बहिणींचे नेहमीच सहर्ष स्वागत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...