🛑 आधी गणाला मनी साठवावा
गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले कि सगळ्यांचीच लगबग सुरु होते. मुलांना सुट्टी पडणार म्हणून मुले खुशीत असतात. आकारिक चाचणी पहिली पार पडलेली असते. शाळेत विविध उपक्रम सुरुच असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची रस्सीखेच सुरु झालेली असते.
मुले घरातील सजावटीत रमलेली असतात. भिंतीना रंग, सफाई, मखर बनवणे, गणेशमूर्ती बघायला जाणे अशी कामे मुलांची आवडीची. अभ्यासापेक्षा मुले यात जास्त रमतात. त्यात त्यांना आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलेली असते. कधी एकदा तो दिवस येतो असे त्यांना झालेले असते. तबला, डग्गा, सुरपेटी, ढोलकी, मृदूंग आणि चकी ( झांज ) यांना बाहेर काढण्यात येते. खूप दिवसानंतर आपल्यावर थाप बसणार म्हणून वादयेही खुशीत वाजू लागतात.
घरातलं वातावरण पूर्ण उत्साहाच्या धबधब्यांनी न्हाऊन निघतं. मुंबईची मंडळी नेहमीच दोन दिवस अगोदर येतात. त्यांची ' मुंबईची बोली ' घरोघर घुमू लागते. मराठी आणि गावाकडच्या मिश्र भाषेने गप्पा रंगून जातात. चाकरमानी आल्यामुळे गावाकडले म्हातारेशितारे पुन्हा तरुण बनून कामात हातभार लावू लागतात.
पताका कापून त्या लावण्यातील मज्जा काही औरच असते. सर्व भिंतीवर कॅलेंडरे झळकू लागतात. गणपतीची खोली हा हा म्हणता सजून जाते. बाप्पासाठी आरास करताना अजिबात कंटाळा येत नाही. अंगातील आजारपण कुठल्या कुठे निघून जाते.
छतांवर रंगीबेरंगी पडदे झुलू लागतात. बघावं तिकडे पाहत राहावं असं वातावरण असतं. एवढं प्रसन्न चित्त होण्यासाठी फक्त एकमेव ' गणपती बाप्पा ' कारणीभूत असतो.
हौशी भजन मंडळे तयारीला लागतात. त्यांची रंगीत तालीम सुरु झालेलीच असते. एकापेक्षा एक उडत्या चालीवर गाणी बसविण्याची जणू स्पर्धाच सुरु होणार असते. गणपतीवर कित्येक गाणी रचली जाण्याचा काळ असतो हा. सारेजण गणपतीमय होऊन जातात. जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्यावर मात करायला शिकवणारा प्रत्येकाचा ' माझा बाप्पा ' तनमनात येत राहत असतो.
चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. आपल्या बाप्पाचं आगमन प्रतिवर्षी हवंहवंस वाटणारं असंच असतं. घरातील मुलेमाणसे गणपतीसाठी एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना पाहून थोरामोठ्यांची छाती फुलून येते. आरत्या, भजने आणि खाद्यपदार्थांची रेलचेल सुखावून जाते. माणसे तनाने आणि मनाने सुद्धा अधिकाधिक जवळ येऊ लागतात.
गणपतीसाठी आतून आतुर झालेली माणसे पाहून हा गणेशोत्सव कधी संपूच नये असं वाटत राहत असतानाच त्याच्या विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून पाणी तरळते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, " आधी गणाला मनी साठवावा "
©️ प्रवीण अशितोष कुबल
मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १









No comments:
Post a Comment