Thursday, July 11, 2024

🛑 मुलं घरी अभ्यासच करत नाहीत

 🛑 मुलं घरी अभ्यासच करत नाहीत

          शीर्षक वाचून तुम्ही सुद्धा असंच म्हणाल अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण गेली कित्येक वर्षे मी हे ऐकत आलो आहे. अर्थात काही मुले याला अपवाद असतीलच. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. 

          पण हा प्रश्न जसा पालकांना पडतो, त्यापेक्षा जास्त तो माझ्यासारख्या शिक्षकांना जास्त पडतो. आम्हांला जसा अभ्यास हवा असतो, तसा झपाटून अभ्यास करणारी मुलेच आता दुर्मिळ होत चालली आहेत. 

          दरदिवशी शिक्षक घरचा अभ्यास देत असतात. हा घरचा अभ्यास मुलांनी करावा असं अपेक्षिलेलं असतं. दिलेल्या अभ्यासापैकी सर्वच अभ्यास महत्वाचा असतो. पण मुले त्यापैकी आपल्याला जमणारा थोडासा अभ्यास करुन दुसऱ्या दिवशी ' विसरलो, लाईट नव्हता, पेन संपले, बरे नव्हते, आणि अशी अनेक कारणे सांगून प्रत्येक दिवस घालवायचे बघत असतात. त्यांना आजचा दिवस गेल्यासारखे वाटते, पण एक अभ्यासयुक्त दिवस त्यांच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून गेलेला असतो. 

          शिक्षकांना अभ्यासक्रम, उपक्रम आणि दैनंदिन कामे सतत येतच असतात. ती करता करता अभ्यास शिकवायचा असतो. शाळेच्या तासांपैकी सर्वच विषयांचे नेहमीच अध्यापन होणे शक्यही नसते. केवळ वाचन आणि घोकंपट्टी म्हणजे अभ्यास नसतो. केलेल्या अभ्यासाचा उपयोग मुलाने पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी चिरकाल करावयाचा असतो असे अपेक्षिलेले असते. 

          आज मुले घरी गेल्यावर काय करत असतील ? दप्तर जागेवर नीट ठेवतात का ? दिलेला अभ्यास एका जागेवर बसून सुंदर अक्षरात लिहितात का ? कि मोबाईल घेऊन त्यावरच अभ्यास करत बसतात ? गेम खेळत बसतात?  यु ट्युब बघत बसतात ? पालकांनी मोबाईल दिलाच नाही तर..... तर मग त्यांचा मोर्चा टीव्ही कडे वळत असेल का ? कार्टून्स आणि त्यांना आवडणारे किड्स चॅनल रिमोटवर भराभर बदलत असतील का ? नाहीतर घरात दप्तर फेकले कि शाळेचे कपडे न बदलता शेजारी पाजारी खेळायला जाणारी मुलेही असतीलच. हे सगळं न करता प्रामाणिकपणे अभ्यास करणारी मुले पाहिली तर आजच्या पालकांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो. 

          घरी गेल्यावर जी मुले स्वतःहून अभ्यासाला बसतील ती मुले खरंच कौतुकास पात्र आहेत. पण आजच्या मुलांना सतत कानीकपाळी ओरडावे लागते. अभ्यास करा रे...... अभ्यास करा रे...... असा नुसता पिच्छा पुरवावा लागतो. तेव्हा कुठे मुले कशीतरी मारुन मुटकुन अभ्यासाला बसली तर त्यांना आपण पालकांवर आणि शिक्षकांवर फार मोठे उपकार करत आहोत असे वाटत असेल. 

          शिक्षक नेहमीच अभ्यास देत असतात. रोजचा अभ्यास त्या त्या दिवशी पूर्ण करण्याबाबत पुन्हापुन्हा सांगत असतात तर त्यांच्या पदरी नेहमीच अपेक्षाभंग येत राहतो. स्वतः कमी नसताना ज्यावेळी मुले कमी पडताना दिसतात, त्यावेळी जे दुःख होते ते नेहमी सलत राहणारे असते. सतत सांगून जर मुले पालकांचे ऐकत नसतील तर अशी मुले शिक्षकांचे का ऐकतील ? किंवा कशी ऐकतील असा मलाही प्रश्न पडतो. 

          संध्याकाळी मुले अभ्यासाला बसण्यासाठी जी जागा निवडतात, तिथे भला मोठा टीव्ही त्यांचा अडसर बनलेला असतो. घरातील मोठी माणसे दिवसभर कामाने दमून विश्रांती घेत असतात. टीव्ही सिरीयल बघणे ही त्यांची दिवसभराची विश्रांतीच असते. त्यांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. असलाच तर टीव्हीवर एखादी मालिका त्यांना मुलांपासून दुरावत राहते. मग मुलेसुद्धा त्यात सामील होतात. पालकांबरोबर मुलांचेही मनोरंजन होत राहते. एक सिरीयल संपते, दुसरी सुरु होते. तिसरी, चौथी करत रात्रीचे नऊ, दहा, अकरा वाजतात. आता जेवत जेवत टीव्ही बघणे सुरु राहते. मुलांचा आजचा अभ्यास दुसऱ्या दिवसावर जात राहतो. 

          मुले सकाळी लवकर उठण्याची शक्यता नसतेच. उशिरा उठलेली मुले मग शाळेत जायची तयारी करु लागतात. अपूर्ण अभ्यास झालेली मुले पुन्हा एकदा शाळेत येतात. पुन्हा संध्याकाळी शाळा सुटते. पुन्हा तसेच चक्र सुरु राहते. खरा अभ्यास करायचा राहूनच जातो. शिक्षक आणि पालक यांचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. यावर काय करायचे ? ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनीच उत्तरे शोधायची असे सांगण्यात येते. गृहकार्य एक आव्हान???

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Monday, July 1, 2024

🛑 सुंदर मी होणार

🛑 सुंदर मी होणार

          सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. सुंदर दिसणं आणि सुंदर असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शाळेत येणारी सर्वच मुलं सुंदर असतात. ती शरीराने आणि मनाने दोन्ही प्रकारे सुंदर असतात. त्यांच्या मनाचा ठाव घेता आला तर ? किती सुंदर विचारांचं मधाळ पोळं आपल्या सोबत सतत असतं हे माझ्यासारख्या शिक्षकांचं भाग्यच. 

          मनात सुंदर भावना घेऊन आलेली ही निष्पाप मुले सतत आमच्या सहवासात असतात. आमच्या जीवनाचं जणू सोनंच होऊन जातं. नोकरीत असताना आम्ही हे दुर्मिळ भाग्य नित्यनियमाने अनुभवत असतो. शाळेत येणारी मुले रोज नव्या दमाने शिकण्यासाठी आतुरतेने आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात. आपण त्यांच्या अपेक्षांना किती पात्र ठरतो देव जाणे ? आपलं आणि त्यांचं एकदा जमलं की ती आपल्यावर पालकांपेक्षा जास्त विश्वास ठेऊ लागतात. त्यांच्या विश्वासाला आपण अजिबात तडा पडू देता कामा नये हे सतत आपल्या लक्षात असायला हवं. कारण आपण शिक्षकच त्यांचे पहिले वहिले आदर्श असतो. म्हणून पहिलीची मुलगी तिला ' तू कोण होणार ? '  म्हणून विचारताच झटक्यात सांगून टाकते, ' मी पहिलीच्या बाई होणार !!! ' तिचं हे उत्तर आपल्याला सर्वांनाच विचार करायला लावणारं आहे. ती शाळेत आल्यापासून पहिलीच्या बाईंकडेच पाहत असते. बाई जशा बोलतात, तशीच ती बोलण्याचा प्रयत्न करत असते. बाई वर्गात कशा शिकवतात, कशा ओरडतात, कधी मारतात याकडे तिचं बारकाईने असलेले लक्ष गांभीर्याने घेतले पाहिजे. अर्थात ही गोष्ट घरच्यांना सुद्धा लागू पडते. 

          कारण लहान मुलांचं हे बालमन टिपकागदासारखं सगळ्या गोष्टी टिपण्याचं काम करत असतं. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबरच असतात यावर त्यांचा दृढविश्वास असतो. आईने किंवा बाबांनी सोडवून दाखवलेले उदाहरण बरोबर असलं तरी जोपर्यंत बाई त्याला बरोबर म्हणत नाहीत, तोपर्यंत मुलाचा अजिबात विश्वास बसत नाही. याचा अर्थ असा होतो कि आपल्या शाळेत आलेलं प्रत्येक मूल आपल्या सर्व हालचाली लक्षपूर्वक पाहत असतं याकडे आपलं लक्ष असायला हवं. आपण करत असलेल्या अनावश्यक हालचालीसुद्धा मुलांच्या नजरेतून सुटत नसाव्यात. 

          शाळा सुटण्याची वेळ झाली होती. मी सकाळच्या परिपाठाला उपस्थित नसल्याचे एका मुलीच्या दिवसभर लक्षात असेल हे माझ्या लक्षात नव्हतेच. मी शाळेच्या काही कामानिमित्त थोडा उशिरा आल्याने आजचा परिपाठ मला चुकला होता. आज यामिनीचा वाढदिवस होता. यामिनी नुकतीच पहिलीच्या वर्गात दाखल झाली होती. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तिची आणि माझी पुसटशी ओळख झाली होती. शाळा पूर्वतयारी मेळाव्यांच्या दोन टप्प्यांमुळे ती मला चांगलीच ओळखू लागली होती. मी तिचा वर्गशिक्षक नव्हतोच. 

          शाळा सुटता सुटता कुणीतरी दाखल्यासाठी आले होते. मी दाखला बनवून देण्याच्या गडबडीत. माझं लक्ष दाखल्यात काही चुकू नये याकडे लागलं होतं. दाखला लिहून पूर्ण झाला होता. कुणीतरी मला मागे हात लावीत असल्याचं जाणवलं. ती यामिनीच होती. तिचा आज वाढदिवस होता.  तिने आपल्या चिमुकल्या हातांनी दोन चॉकलेट्स माझ्याकडे धरली होती. मी आश्चर्यचकित झालो होतो. माझा दाखला लिहून पूर्ण होईपर्यंत ती माझी वाट बघत थांबली होती. आता मी मोकळा झालो आहे असे वाटल्यानंतरच तिने हसतमुखाने हात पुढे केला होता. पहिलीत नव्याने हजर झालेल्या मुलीने मला देण्यासाठी दोन चॉकलेट्स शाळा सुटेपर्यंत खाल्ली नव्हती हे विशेष नमूद करायला हवे. त्यावेळी मला ती मुलगी अतिशय सुंदर दिसली. तिचं ते निरागस सौंदर्य कोणालाही लाजवणारं असंच होतं. ही मुलगी पुढे नक्कीच आदर्शवत होणार यात मला आजतरी शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १


🛑 एक तास पानांचा

🛑 एक तास पानांचा

      विज्ञान शिकविताना शाळेत विविध प्रात्यक्षिके घेतली जातात. मुले सतत निरीक्षण करीत असतात. त्यांची निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा खूपच जलद असते. 

        विज्ञान आणि परिसराभ्यास या विषयांना पूरक असा अभ्यास विषयक उपक्रम घेण्याचे मनात होते. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सामील करुन घेता आले तर ? हा प्रश्न सतावत होताच. शिक्षकाच्या मनात प्रश्न आला कि त्याचं आव्हानात रूपांतर होतं असतं. कोणतेही आव्हान हसतमुखाने स्वीकारणारे अनेक शिक्षक खऱ्या अर्थाने अध्ययनासाठी मुलांना तयार करीत असतात. 

       परिसरातील झाडांचं निरीक्षण करणारी मुले त्यांच्या पानांना ओळखत असतात. तरीही परिसरात उपलब्ध नसणारी झाडे नेहमीच मुलांसाठी अनोळखी राहून जातात. सर्व मुलांना जास्तीत जास्त झाडांची माहिती व्हावी हा उद्देश सफल होण्यासाठीचा उपक्रम सार्थकी लागला. 

        मुलांना पाने आणण्याचे आव्हान दिले होते. मुलांना असं काहीतरी हटके करायला आवडत असतं. मी ते सांगितलं आणि विसरूनही गेलो. आज शाळेत आलो मात्र, मुलांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. प्रत्येकाच्या हातात पाने दिसत होती. मी त्यांच्या या कुतूहलाचे हसतमुखाने स्वागत केले. कुतूहल म्हणजे त्यांना प्रत्येकाला आपल्याला माहिती असलेल्या पानांची नावे मला कधी एकदा सांगतो असे झाले होते. पानांची नावे व पाने यांचं सादरीकरण करताना मी मुलांच्या डोळ्यातून ज्ञानरचना पाहत होतो. पहिलीत नव्याने दाखल झालेली मुलेसुद्धा न घाबरता पानांची ओळख सांगत होती. एका मुलाने आपल्या पॅंटीच्या दोन्हीही खिश्यातून पाने काढून दाखवताना मला तो ज्ञानाचा खजिनाच खुला करतोय असे वाटत होते. 

        मी खूप खुश झालो. शैक्षणिक समाधान म्हणजे दुसरे काय असते ?  शाळेची सुरुवातही झाली नव्हती. पण मुलांचे शिक्षण कधीच सुरु झाले होते. मी माझ्या मुलांमध्ये मुलासारखाच होऊन गेलो होतो. 

        परिपाठाचा टोल झाला. सगळी मुले परिपाठाला बसली. सर्वांच्या हातात, खिशात पानेच पाने होती. नवीन आलेल्या विज्ञान शिक्षिका वंजारी मॅडम मुलांशी संवाद साधत होत्या. त्यांनी मुलांना पानांचे प्रकार समजावून सांगितले. सर्व मुलांनी ४३ पानांची ओळख करुन दिली होती.आंबा, काजू, चिकू, फणस, वड, पिंपळ, जास्वंद, सोनचाफा, गुलाब, मोगरा, सागवान, आवळा, चिंच, लिंबू , रामफळ,  सीताफळ,  अशोक, आकेशिया, मयूरपंख, तुळस, न्हिव, रक्तचंदन,  धूप, कापूर, सफरचंद, श्रीकृष्ण वड,  शेवगा,  पपई,  चवळी, पारिजातक,  अश्वगंधा, आपटा, मोरावळा, करवंद, कढीपत्ता, कडुलिंब,जांभूळ,डाळिंब,  शमी, लिंबू, रतांबा, बदाम इतक्या वनस्पतींची माहिती घेताना सर्व मुलांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतलेला मी प्रत्यक्ष पाहत होतो. नवीन बाईं मुलांच्या परिसरात नसणाऱ्या झाडांची पाने मुद्दाम जाऊन एका बागेतून घेऊन आल्याचे समजले आणि मला त्यांचा अभिमान वाटला. अशा विज्ञाननिष्ठ शिक्षकांच्या ताब्यात असणारी मुले विज्ञानप्रेमी होणारच याची मला अधिक खात्री वाटू लागली. शासनाने असे विज्ञान शाखेचे पदवीधर शिक्षक नेमून जिल्हा परिषद शाळेच्या वैभवात अधिक भर घातली आहे. 

        दुपारनंतर मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला अधिक चालना देत पानांपासून गणपतीची आकृती बनवली. मुलांच्या अशा अभिनव कल्पनाशक्तीला खरंच सलाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १










Saturday, June 22, 2024

🛑 एक तास गाण्यांचा

🛑 एक तास गाण्यांचा

          लहान मुलांना जात्याच गाणी खूप आवडत असतात. अंगणवाडीतून पहिलीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात शाळेविषयी आपुलकी वाटणं हे गाण्यांमुळे अधिक सोपं होऊ शकतं. 

          शाळा सुरु होऊन आठ दिवस झाले असतील. पुन्हा शनिवारच आला होता. शाळेत जाईपर्यंत पाऊस आलाच नव्हता. शाळेत पोहोचलो तर पाऊस धोधो कोसळू लागला होता. माझ्या मनातही या पावसामुळे विचारांचा धबधबा कोसळू लागला होता. मी शाळेत येता येताच ठरवित असलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

          हल्ली शासनाने शनिवारी ' दप्तराविना शाळा ' घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शाळेत दप्तर आणलं नसलं तरी शिक्षण घडू शकतं. पुस्तकाबाहेर जाऊन मुलांच्या शब्दसंग्रहात भर घालायची असेल तर मुलांना आवडणाऱ्या गाण्यांचा उपयोग करता आला तर मुलांनाच ते खूप आवडेल. आम्ही आज तेच केलं. 

          परिपाठाला मुले बसत होती. बाहेर पाऊस बरसत होता. मुसळधार पावसाने आपली गाणी आमच्या ओठात आणली होती. धोय धोय पडणारा पाऊस आमच्या मुखातून ' धितांग तांग ' गाणं बरसवून गेलं होतं. मुले मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती. वाकडा तिकडा पडणारा पाऊस शब्दातूनही मुलांच्या डोक्यात घुसू पाहत होता. मुलांनी आता आपला सूर मनापासून सुस्वर करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व मुले खरंच गाण्यांच्या पावसात न्हावून जाताना दिसत होती. 

          एक गाणे संपले. दुसरे सुरु झाले होते. छोट्या मुलांसाठी ' बडबडगीतांना चांगले दिवस आले आहेत. म्हणून एक सुंदर बडबडगीत घेतले. तेही मुलांनी अगदी स्पष्ट म्हटले. मुलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. म्हणून अजून एक बालगीत म्हणायचे ठरवले. शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर '  दे मला आई खाऊची वाटी ' म्हणणारी मुले या गाण्यावर अधिक रमलेली दिसली. मनात कल्पना अधिक आकार घेत गेली. या एक तासांच्या गाण्यांच्या उपक्रमात सर्व शिक्षकांना सहभागी होण्यासाठी सांगितले. शाळेतील तिन्ही मॅडम लगेच तयारही झाल्या. 

          मी तालासुरात गाणे म्हणणार होतो. माझ्यामागून मुले जसंच्या तसे गाणे म्हणणार होती. गाणे ऐकत असताना मी तिन्ही शिक्षिकांना एक कागद दिला. त्यावर काही लिहिण्यास सांगितले. सीमा वरुणकर यांना गाण्याचा अर्थ समजावून सांगायचा होता. गाण्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं. सुजाता कुडतरकर यांना गाण्यातील शब्द लिहून काढायचे होते. लिहिलेल्या शब्दांवर विविध सोपे प्रश्न, मराठी प्रतिशब्द मुलांकडून काढून घेण्याचे काम दिले होते. नवीन नियुक्त पदवीधर शिक्षणसेविका हेमा वंजारी यांच्याकडे गाण्यातील शब्दांना इंग्रजी शब्द मुलांकडून वदवून घेण्यासाठी प्रयत्न करायचे होते. तिन्ही मॅडम या उपक्रमासाठी सज्ज झालेल्या पाहून मला खूप हुरूप आला. 

          ' सुटली गं शाळा, पुसली मी पाटी ' या गाण्यांच्या तिन्ही कडव्यांमध्ये गंमत आहे. मुलांना ही गंमत ऐकवत असताना आपण शब्द चित्र त्यांच्यासमोर उभं करत असतो. आणि आम्ही चौघानी मिळून ते शब्दांचं आभाळ उभं केलं होतं. मुलं पटापट उत्तरं देत होती. मुलांना बोलताना पाहून आम्ही सर्व शिक्षकही थक्क झालो होतो. मुलांना खूप गोष्टी माहिती असतात. फक्त त्या आपल्या उपक्रमातून मुलांच्या डोळ्यासमोर उभ्या करणं हे आपलं काम असतं. प्रत्येकवेळीच ते डिजिटल असायला हवं असं काहीही नसतं. तुम्ही मुलांच्या निरागस डोळ्यात पाहत शिकवलात तर त्यांच्या डोळ्यात जमलेलं भलं मोठं आभाळ तुम्हांला नक्कीच दिसू लागेल. मुलांसाठी दिलेला हा गाण्यांचा एक तास सार्थकी लागल्याचे प्रत्येक शिक्षकांच्या डोळ्यात दिसत होते. प्रत्येक मुलाच्या डोक्यात गाण्यांचा नवीन पाऊस धबधबला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1 )


Saturday, June 15, 2024

🛑 सुट्ट्या संपल्या आता अभ्यास सुरु

🛑 सुट्ट्या संपल्या आता अभ्यास सुरु


          शाळा सलग सुरु असली कि सुट्टी पडावी असे वाटते. पण सलग सुट्टी असली कि कधी एकदा शाळा सुरु होते असे वाटते. सुट्टीपेक्षा शाळेत जाणं कितीतरी पटीने आनंददायक असतं. 

          एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या कि मुले सर्रास शाळेत जाणं बंद करतात. अर्थात शाळेतील अध्यापन बंद झालेलं असलं, तरी संस्कार देणं सुरुच असतं. संस्कार हिच आपल्या आयुष्याची शिदोरी असते. सुसंस्कारीत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शाळेने स्विकारलेली असते. अर्थात शाळेतील सहा तास संस्कार करताना शाळेला सुद्धा मर्यादा पडतात. 

          शाळा सुरु झाली कि अभ्यास सुरु होतो. अभ्यास सुरु झाला कि वाचन, लेखन आणि संभाषण सुरु होत असते. मुलांनी सर्व कला कौशल्ये अवगत करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केलेले असते. सध्या तर शाळांमध्ये उपक्रमांचा पूरच आलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. 

          अर्थात उपक्रम हे मुलांच्या भल्यासाठीच असतात. त्यातून मुलांचं विकसनच लक्षात घेतलेलं असतं. केवळ पुस्तक शिकवलं म्हणजे मुले शिकली असं होत नसतं. केवळ पाठांतर केलं म्हणजेही अभ्यास होत नसतो. आपण जे वाचलं, लिहिलं ते समजलं किती हे अधिक महत्त्वाचे आहे. 

          आजची मुले घरी आल्यावर नुसती लेखनात दंग असतात. बिचाऱ्यांचे कंबरडे मोडत असेल लिखाण करुन. पण दिलेला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे अशा सूचना दिलेल्या असतात. त्या सुचनांचे पालन करताना मुलांचे काही चुकत नसावे. लिहूनही अभ्यास होत असतो. कारण लिहितानासुद्धा आपण पुन्हा एकदा वाचतोच ना? पण नुसते उतारे मारल्याने काहीही साध्य होत नसतं. काही मुले अक्षरशः कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी करताना दिसतात. त्यांना आपण लिहिलेलं ओ की ठो समजत नसतं. असे लेखन निष्फळ ठरत असते. 

          म्हणूनच मुलांनी दररोज वाचन केलं पाहिजे. वाचताना ते समजपूर्वक वाचलं पाहिजे. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. वाचाल तर आयुष्यात नक्की वाचाल. वाचन माणसाला आयुष्यात समुद्ध अनुभव देत असतं. वाचनानंतर लेखन येतं. 

          बघून कोणीही लिहिल. स्वतः विचार करुन लिहिणं जमलं कि लेखन आलंच म्हणून समजा. पण आपल्या सर्वांना नेहमीच आधाराची सवय झालेली आहे. गाईड हा आपला संदर्भग्रंथ झालेला आहे. त्यामुळे आपल्या डोक्याला चालना देण्याचं राहूनच जातं. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेट सर्च करुन शोधण्यात आपण कमालीचे पटाईत झालो आहोत. मग आपल्या बुद्धीला चालना कधी मिळणार ?

          शाळा सुरु झालेल्या दिवसापासून प्रत्येक मुलांनी आणि पालकांनी या गोष्टींचा विचार केलात तर केलेला अभ्यास चिरकाल लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. कारण ती पोपटपंची नसते, तेच खरे स्वतःहून केलेले स्वयंअध्ययन असते. 

          शाळा सुरु झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेत शाळा पूर्वतयारी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु होते. मागील वर्षाचे ज्ञान पुन्हा उजळणी स्वरूपात घेण्यात येत असते. किती मुले कोणत्या गोष्टीत मागे आहेत, हे त्यामुळे समजत असते. मुलांनी मराठी पुस्तकाचे वाचन करीत राहावे. हिंदी कविता वाचाव्यात. शिक्षकांनी शिकविण्यापूर्वी पुढे पुढे वाचत गेल्यामुळेही खूप चांगला फरक पडू शकतो. पाढे पाठ करावेत. विसरायला होतात म्हणून पुन्हा पुन्हा म्हणून पाहावेत. गुणाकार आणि भागाकार या प्रक्रिया त्यावरच अवलंबून आहेत. 

          गेले महिनाभर सुट्टीत अनेक मुलांनी पेन हातात घेतलेले नसेल. त्यांना तर आता अचानक लिहिताना जमणार नाही. म्हणून आजपासून दररोज पाच ओळी शुद्धलेखन, अनुलेखन सुरु करायला हरकत नाही. इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा म्हणून इंग्रजी पुस्तकातील वाचायला येत असलेल्या शब्दांची यादी करावी. अनोळखी शब्दांची वेगळी यादी काढून इंग्रजी शब्दकोशात त्यांचे अर्थ जाणून घ्यावेत. 

          अर्थात अभ्यास करायचा असेल तर दिवसाचा वेळही पुरणार नाही. पण मनापासून करायचाच नसेल तर शिक्षकांनी दिलेला अभ्यास फक्त वहिपुरता मर्यादित राहील, डोक्यात कधीच जाणार नाही हे शंभर टक्के खरे असल्याची प्रचिती आली आहे. म्हणून आजपासून अभ्यासाला लागा. 


©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. 1

Tuesday, July 25, 2023

🛑 अभ्यासाची गोडी , करी ज्यास वेडी

🛑 अभ्यासाची गोडी , करी ज्यास वेडी

          अभ्यास हा शब्द शाळेत गेल्यानंतर परिचयाचा होतो. शाळा आणि अभ्यास हे एक समीकरणच आहे जणू. बुद्धीला सतत खाद्य मिळत राहायला हवे असते. ते मिळाले कि बुद्धीला धार येत जाते. 

          अभ्यास फक्त शाळेपुरता मर्यादित करायचा नसतो. तो शाळा संपली तरी करता येतो. फक्त तो करण्याची आवड असायला हवी. अभ्यास एके अभ्यास करणारी मुलेही पाहायला मिळतात. 

          ही अभ्यासाची गोडी निर्माण होईपर्यंत काही काळ जावा लागतो. नुकतीच पहिलीत आलेली मुले पुस्तकं किती वेळ हातात धरतात ? एकदा त्यांच्या हातात पुस्तक टिकले ना , मग आपण जिंकलोच. ही पुस्तकेच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करत असतात. 

          मुलांची वाचनाची आवड त्यांचं वाचन सुधारायला मदत करत असते. एकदा वाचनवेग वाढत गेला कि मुलांना आपण काय वाचतोय तेही समजत जातं. समजलेलं उमजत जातं. उमजेल तसं वाचनाचा वेळ वाढत वाढत जातो. पुस्तक जास्त काळ हातात टिकलं , म्हणजे अभ्यास खऱ्या अर्थाने सुरु होत जातो. 

          मुलांना शिक्षकांनी शाळेत दिलेला अभ्यास कधी एकदा घरी जाऊन करतो असे झाले पाहिजे. हे व्हायला वेळ लागेलच. पण ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात लवकरात लवकर जितकी येईल , तितकी मुले स्वयंअध्ययन करु लागतात. ही अभ्यासाची सवय अंगी भिनू लागते , रुजू लागते. हा अभ्यासाचा संस्कार मुलांवर होणे ही काळाची गरज आहे. मोबाईल बाजूला ठेवून मुलांनी पुस्तकांना , वह्यांना , दप्तराला जवळ केले पाहिजे. 

          आज मी शाळेत काय काय शिकलो ? उदाहरणे सोडवली तेव्हा ती बरोबर येण्यासाठी केलेले प्रयत्न कधीही वाया जात नसतात. उत्तरे जशी बरोबर येत जातात , तसा आत्मविश्वास वाढत राहतो. गणिताची तेव्हाच आवड निर्माण होते. माझे पाढे पाठ आहेत , त्यामुळे माझे गुणाकार , भागाकार अजिबात चुकत नाहीत हा गणितविषयक आत्मविश्वास अवघड उदाहरणे सोडवताना कामी येतो. आयुष्यात येणारी भयानक संकटे पार करताना हेच गणित उपयोगी पडत असतं हे आपल्या लक्षातही येत नाही. 

          जाड चष्मा लागला म्हणजे अभ्यासू असे नसते. अभ्यासाबरोबर प्रत्येकात संयम येत जातो. पूर्वीपेक्षा मी अधिक विकसित होत आहे ही जाणीवही पुरेशी असते. 

          अभ्यास करुन कंटाळा आला तर थोडा बदल करायला हवा. जे वाचले , लिहिले ते लक्षात राहण्यासाठी अभ्यास विश्रांती गरजेची आहे. मग एखादे चित्र रेखाटावे , छान गाणे म्हणावे. अभ्यासाने वेगळे प्रकट होताना आपल्यात सर्व विषयात रस निर्माण होत जातो. सुंदर हस्ताक्षर , शुद्धलेखन , मुकवाचन , प्रकटवाचन , उदाहरणांची सोडवणूक हे सर्वच मुलांच्या स्वयंबदलाची नांदीच आहे. 

©️ प्रवीण कुबलसर



Monday, April 10, 2023

🛑 नळी फुंकिली सोनारे

🛑 नळी फुंकिली सोनारे

          आपल्या पंचज्ञानेंद्रियांमध्ये कान हे इंद्रिय अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत असते. सर्वच इंद्रिये आवश्यक असल्यानेच ती निसर्गाने माणसाला बहाल केली आहेत. तरीही यातील एखादं दुसरं इंद्रिय काम करत नसेल तर शरीरावरील सर्व नियंत्रणच बिघडून जाते. 

          जन्माला येताच मुलाला ताट वाजवून मोठा आवाज ऐकवला जातो. तो ऐकू येईपर्यंत ताट वाजवले जाते. त्या आवाजाच्या तीव्रतेमुळे मूल रडू लागते. रडल्यामुळे त्याची सर्व इंद्रिये सुरु होण्यास सुरुवात होते. डोळे तर उघडलेलेच नसतात , तरीही कानांचे काम सुरु झालेले असते. 

          ऐकू न येऊ शकणारी मुले पुढे बोलुही शकत नाही. त्याच्यावर मूकबधिर , कर्णबधिर असा कायमचा शिक्का बसतो. अशा मुलांची इतर इंद्रिये सशक्तपणे कार्य करताना दिसतात. पण त्यामुळे आपल्या कानांचे महत्त्व कधीही कमी होणार नसते. 

          दोन्ही कान असूनही आपण कितीसे नीट ऐकत असतो. नीट ऐकत नाही आणि अनेकदा अर्थाचा अनर्थ मात्र करुन घेत असतो. नीट ऐकण्याची सवय लावणं ही काळाची गरज आहे. हवे ते ऐकत नाही आणि नको असलेले व्यवस्थित ऐकत बसतो ही आपली चूकच आहे. नाही का ?

          पहाटे पहाटे निसर्गातील विविध आवाज ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो. हे कर्णमधुर आवाज मनाला सुसंवेदना देत असतात. शहरी जीवनात हे कर्णमधुर आवाज क्वचित ऐकायला येत असतील. चांगले संगीत ऐकताना जसे आपण मोहरुन जातो , तसे कर्कश आवाजाने बेजार होतो. कधी कधी म्हणूनच माणसं एकांतात जाणं पसंत करतात. जीवन इतकं धकाधकीचं झालं आहे की आता या सर्वांची सवयच करुन घ्यावी लागते आहे. 

          आपण एकटेच कधी स्वतःशी बोलत असतो , तेव्हा ते आपण नीट ऐकण्याची क्रिया होत असते. तेवढ्यात अचानक कुणीतरी आपल्या विचारात बाधा आणतं. आपण पुन्हा त्या विचारातून पुन्हा परत सामान्य स्थितीत यायलाही काही मिनिटं लागतातच. विचारांची सरमिसळ होत राहते. प्रत्येक शब्दाला विविधांगी अर्थ असतात. त्यांचा अन्वयार्थ लावणं जिकिरीचं होऊन बसतं. एकाग्रता ढासळते. कान मिटून घ्यावेसे वाटतात. 

          निसर्गाने आपल्याला एकच तोंड दिले आहे. कान मात्र दोन दिले आहेत. याचा अर्थ आपण जेवढे बोलणार त्याच्या दुप्पट ऐकायचे आहे. आपल्याकडून मात्र अगदी उलट घडत असतं. आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त.

          माझ्या एका मित्राने मला एक वाक्य शिकवले होते. तो म्हणे , " यान माडती कान झाडती , कानात माशी कुडकुडती " हे वाक्य आम्हाला ' कन्नड ' वाटत असे. पण त्याचं खरंच आहे , आपल्या कानाकडे जर एखादी माशी किंवा डास गुणगुणत असेल , तर आपल्याला राग येऊन आपण आपला कान झाडतोच ना ? 

          या आपल्या कानांची आपण अतिशय काळजी घ्यायला हवी. तीव्र आवाज ऐकू नयेत. हल्ली डॉल्बी सिस्टीमने वाजणारे आवाज कानठळ्या आणतात. कानातूनच नव्हे तर सर्व शरीराला कंप फुटतो. असे आवाज नित्य ऐकू आले तर लवकरच श्रवणऱ्हास होणार हे ठरलेले असते. गाड्यांचे कर्णकर्कश भोपु तेच तर करतात. ध्वनी प्रदूषण होते आणि कानांच्या यंत्रांची भर पडत जाते. श्रवणयंत्र लावण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. श्रवणयंत्र नाही म्हणून की काय प्रत्येकाच्या कानात ' इयरफोन ' सारलेला असतो. ब्लुटूथच्या नावाने विकतचे प्रदूषण यंत्रच बसवून कर्णरोगांना आमंत्रण देणे सुरुच आहे. कानात इयरबड घालून खुळ्यासारखी रस्त्याने एकटीच बडबडत चाललेली माणसे बघून हसू आवरत नाही. या आधुनिक यंत्रांचा अतिरिक्त वापर कर्णदोषांना जन्म देत आहे हे वेगळे सांगायला नको. मोबाईलवर तासनतास बोलत बसणारी माणसं वृद्धापकाळात कानांच्या त्रासाने पिडीत होणार हे नक्कीचे आहे. 

          आपले कान चांगले ठेवायचे असतील तर हे सर्व टाळलं पाहिजे. कानात खाज आली तर आगकाडीची काडी घेऊन कान आनंदाने पोखरत बसलेल्या लोकांचे चेहरे पाहिले तर ते पट्टीच्या अभिनेत्याला लाजवतील असे असतात. शेवटी आपले इंद्रिय आहे , त्याचा कसा वापर करायचा ते ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.  

©️ प्रवीण अशितोष कुबल , पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ ( कणकवली )





गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...