🛑 मुलं घरी अभ्यासच करत नाहीत
शीर्षक वाचून तुम्ही सुद्धा असंच म्हणाल अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण गेली कित्येक वर्षे मी हे ऐकत आलो आहे. अर्थात काही मुले याला अपवाद असतीलच. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच.
पण हा प्रश्न जसा पालकांना पडतो, त्यापेक्षा जास्त तो माझ्यासारख्या शिक्षकांना जास्त पडतो. आम्हांला जसा अभ्यास हवा असतो, तसा झपाटून अभ्यास करणारी मुलेच आता दुर्मिळ होत चालली आहेत.
दरदिवशी शिक्षक घरचा अभ्यास देत असतात. हा घरचा अभ्यास मुलांनी करावा असं अपेक्षिलेलं असतं. दिलेल्या अभ्यासापैकी सर्वच अभ्यास महत्वाचा असतो. पण मुले त्यापैकी आपल्याला जमणारा थोडासा अभ्यास करुन दुसऱ्या दिवशी ' विसरलो, लाईट नव्हता, पेन संपले, बरे नव्हते, आणि अशी अनेक कारणे सांगून प्रत्येक दिवस घालवायचे बघत असतात. त्यांना आजचा दिवस गेल्यासारखे वाटते, पण एक अभ्यासयुक्त दिवस त्यांच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून गेलेला असतो.
शिक्षकांना अभ्यासक्रम, उपक्रम आणि दैनंदिन कामे सतत येतच असतात. ती करता करता अभ्यास शिकवायचा असतो. शाळेच्या तासांपैकी सर्वच विषयांचे नेहमीच अध्यापन होणे शक्यही नसते. केवळ वाचन आणि घोकंपट्टी म्हणजे अभ्यास नसतो. केलेल्या अभ्यासाचा उपयोग मुलाने पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी चिरकाल करावयाचा असतो असे अपेक्षिलेले असते.
आज मुले घरी गेल्यावर काय करत असतील ? दप्तर जागेवर नीट ठेवतात का ? दिलेला अभ्यास एका जागेवर बसून सुंदर अक्षरात लिहितात का ? कि मोबाईल घेऊन त्यावरच अभ्यास करत बसतात ? गेम खेळत बसतात? यु ट्युब बघत बसतात ? पालकांनी मोबाईल दिलाच नाही तर..... तर मग त्यांचा मोर्चा टीव्ही कडे वळत असेल का ? कार्टून्स आणि त्यांना आवडणारे किड्स चॅनल रिमोटवर भराभर बदलत असतील का ? नाहीतर घरात दप्तर फेकले कि शाळेचे कपडे न बदलता शेजारी पाजारी खेळायला जाणारी मुलेही असतीलच. हे सगळं न करता प्रामाणिकपणे अभ्यास करणारी मुले पाहिली तर आजच्या पालकांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो.
घरी गेल्यावर जी मुले स्वतःहून अभ्यासाला बसतील ती मुले खरंच कौतुकास पात्र आहेत. पण आजच्या मुलांना सतत कानीकपाळी ओरडावे लागते. अभ्यास करा रे...... अभ्यास करा रे...... असा नुसता पिच्छा पुरवावा लागतो. तेव्हा कुठे मुले कशीतरी मारुन मुटकुन अभ्यासाला बसली तर त्यांना आपण पालकांवर आणि शिक्षकांवर फार मोठे उपकार करत आहोत असे वाटत असेल.
शिक्षक नेहमीच अभ्यास देत असतात. रोजचा अभ्यास त्या त्या दिवशी पूर्ण करण्याबाबत पुन्हापुन्हा सांगत असतात तर त्यांच्या पदरी नेहमीच अपेक्षाभंग येत राहतो. स्वतः कमी नसताना ज्यावेळी मुले कमी पडताना दिसतात, त्यावेळी जे दुःख होते ते नेहमी सलत राहणारे असते. सतत सांगून जर मुले पालकांचे ऐकत नसतील तर अशी मुले शिक्षकांचे का ऐकतील ? किंवा कशी ऐकतील असा मलाही प्रश्न पडतो.
संध्याकाळी मुले अभ्यासाला बसण्यासाठी जी जागा निवडतात, तिथे भला मोठा टीव्ही त्यांचा अडसर बनलेला असतो. घरातील मोठी माणसे दिवसभर कामाने दमून विश्रांती घेत असतात. टीव्ही सिरीयल बघणे ही त्यांची दिवसभराची विश्रांतीच असते. त्यांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. असलाच तर टीव्हीवर एखादी मालिका त्यांना मुलांपासून दुरावत राहते. मग मुलेसुद्धा त्यात सामील होतात. पालकांबरोबर मुलांचेही मनोरंजन होत राहते. एक सिरीयल संपते, दुसरी सुरु होते. तिसरी, चौथी करत रात्रीचे नऊ, दहा, अकरा वाजतात. आता जेवत जेवत टीव्ही बघणे सुरु राहते. मुलांचा आजचा अभ्यास दुसऱ्या दिवसावर जात राहतो.
मुले सकाळी लवकर उठण्याची शक्यता नसतेच. उशिरा उठलेली मुले मग शाळेत जायची तयारी करु लागतात. अपूर्ण अभ्यास झालेली मुले पुन्हा एकदा शाळेत येतात. पुन्हा संध्याकाळी शाळा सुटते. पुन्हा तसेच चक्र सुरु राहते. खरा अभ्यास करायचा राहूनच जातो. शिक्षक आणि पालक यांचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. यावर काय करायचे ? ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनीच उत्तरे शोधायची असे सांगण्यात येते. गृहकार्य एक आव्हान???
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment