Friday, October 18, 2024

स्काऊट म्हणजे चैतन्य

🔴 स्काऊट म्हणजे चैतन्य

        स्काऊट म्हणजे चैतन्य. शाळेत हे चैतन्य आणण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकच करत असतात.  शिक्षक शाळेत येतात तेव्हा चैतन्याच्या लहरी शाळेत दाखल होत असतात.  स्काऊट , गाईड , कब आणि बुलबुल चं एक दिवसीय उजळणी ट्रेनिंग नुकतंच पार पडलं .  
        ठिकाण होतं देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कुल.  माझी या शाळेत दोन ते तीन प्रशिक्षणं झाली होती .  एकदा मी मास्टर ट्रेनर सुद्धा होतो.  देवगड तालुक्यात काम करताना आलेले अनेक शैक्षणिक अनुभव शेअर करताना आज माझ्या काही जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.  सिंधुदुर्ग जिल्हयात नोकरी करताना पहिल्यांदा देवगड तालुक्यात शैक्षणिक कार्य करण्याचं भाग्य लाभलं. दोन शाळांमध्ये काम करताना दोन्ही ठिकाणी मिळालेले अनुभव मला स्वतःला सतत अद्ययावत करणारे होते. आंब्याच्या दिवसांत तिथल्या मोहोराचा सुगंधी वास नाकात भरुन राहिलेला आहे. तो गंध पुन्हा नाकात आला कि जीवनाचं सार्थक होऊन जातं. स्वच्छ , शुद्ध श्वास घेतल्याचा आनंद मिळतो. माझ्यावर आलेल्या अनाहूत संकटामुळे मला देवगड सोडावं लागलं. त्यामुळे मी देवगडला पारखा झालो. पुन्हा आज एक दिवसासाठी प्रशिक्षण स्थळी गेल्यामुळे पुन्हा सगळ्या पूर्वीच्या आठवणी माझ्या मनचक्षू समोर फेर धरुन नाचू लागल्या.  
        मी कबमास्टर म्हणून प्रशिक्षण द्यायला पुढे सरसावलो. माझ्यातील कबमास्टर पुन्हा सर्व शिक्षकांशी संवाद साधू लागला होता. मी वर्गात जसं शिकवतो , अगदी जसाच्या तसाच शिक्षकांना ट्रेनिंग देऊ लागलो होतो.  मी माझं पूर्ण कौशल्य पणाला लावलं होतं. हल्लीच अनेक शाळांमधून नवनियुक्त शिक्षक नियुक्त केले गेले आहेत. जुन्या शिक्षकांकडून त्यांना चांगले संदेश मिळणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये मला माझा पूर्वीचा मी दिसत होता.  मी नवीन नियुक्त झालो असताना उत्साह ओसंडून वाहत होता.  नवनवीन ज्ञान घेऊन नित्यनूतन टवटवीत बनण्याचा ध्यास मला लागलेला होता.  तो ध्यास मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे .  मला दररोज काहीतरी चांगलं नवीन शिकायला मिळावं हे मी ठरवलेलं असतं. त्यामुळे नवीन आणि जुन्या शिक्षकांसमोर मी मला मोकळं केलं. त्यांनी माझ्यातलं चैतन्य पाहून त्यांच्यातलं चैतन्य जागृत झालं असावं.  त्यांनी दिलेला प्रतिसाद खरंच दाद देण्यासारखा होता.  
        मी त्यांना भौतिकशास्त्र विषयातील ' ट्युनिंग फॉर्क ' चं उदाहरण दिलं. हा ट्युनिंग फॉर्क रबरी टायरच्या तुकड्यावर आपटल्यानंतर ' कंप ' पावत असे. त्यातील ऊर्जा तात्पुरती असे .  कंप होणं थांबलं कि त्याच्यातील ऊर्जा शून्य होत असे. मीही तसंच करत होतो .  या नव्या जुन्या शिक्षकांमध्ये तात्पुरतं चैतन्य निर्माण करत होतो. हे चैतन्य टिकवून ठेवणं हे सर्वस्वी त्यांच्याकडेच होतं. त्यांनी या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष मुलांसाठी करावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही नेहमी करत असतो. असो. सुजाण शिक्षक नक्कीच आपली ज्ञानाची ज्योत नित्य तेवत ठेवत राहतील याबद्दल मला अजिबात शंका नाही.  
        आपण शिक्षक म्हणून अनेक उत्तम उपक्रम शाळेत राबवत असतो. या उपक्रमांना ' स्काऊट , गाईड , कब आणि बुलबुल ' या संकल्पनेचा स्पर्श केलात कि झालं. स्काऊट हा आता आपल्या अभ्यासक्रमातीलच विषय आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा याच्या तासिका घेताना ' निसर्गाच्या सानिध्यात ' घ्यायला हवी. कारण स्काऊटींग हे एक आऊटींग आहे. मुलांना निसर्गातील आल्हाददायक वातावरणात शिकायलाही खूप आनंददायक वाटतं. कारण निसर्ग म्हणजे बिनभिंतींची शाळा असते. तिला खिडक्या नसतात. मुले नेहमी शिकवत असताना वर्गाच्या बाहेर बघत असताना दिसतात. निसर्गाला खिडक्या नाहीत कि दारे !!! मुले त्यावेळी आपल्याकडेच पाहतात .  आपलं चैतन्य मुलांना दिलं तर ते वाढत जातं. मुलं चैतन्य परिधान करुन भारावून शिकत राहतात. त्यांच्या या टिपून घेण्याच्या सवयीला हेरलं पाहिजे .  त्यांच्या सर्व गोष्टी तेव्हाच लक्षात राहतील , जेव्हा तुम्ही शिकवत असलेले शैक्षणिक घटक वेगळ्या पद्धतीने शिकवता. खेळत खेळत ज्ञानाची रचना करत शिकल्याने दृढीकरण होण्यास मदत होते. थोडेच शिकवा , पण जे शिकवाल ते त्यांच्या तनामनात कायमचे रुजले पाहिजे. 
        म्हणूनच मला या स्काऊट विषयाबद्दल कायमच कौतुक आणि अप्रूप वाटत आलं आहे. असा कोणताही विषय नसेल कदाचित जो तुम्ही  स्काऊटमध्ये शिकवू शकत नाही. मानसिक आरोग्य , योग , दिशा , नकाशा , कृती , उपक्रम , गीतगायन , नृत्य , अभिनय , गृहकार्ये , सेवाकार्ये , संग्रह , रिकामपणाची कामगिरी , पाठांतर , संस्कारगाणी , संस्कारनाट्ये , संस्कारगोष्टी , संस्कारखेळ आणि अशा कितीतरी क्रियाकलापांनी स्काऊटचा अभ्यास आपल्या मुलांना समृद्ध बनवू शकतो. माझ्या जीवनात जेव्हा केव्हा दुःखाच्या आठवणींचे वारे वाहतात , तेव्हा तेव्हा मी स्काऊटला जवळ केले आहे. तुम्ही या स्काऊट चैतन्याचे महत्त्व जाणा आणि तुमच्या आयुष्यात अधिकचं चैतन्य आणा. 

Ⓒ  प्रवीण अशितोष कुबल , स्काऊटमास्टर / कबमास्टर 
मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं . १ 
        

No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...