🛑 शारदे हवे तुझे वरदान
मुलांनो, नुकताच प्रत्येक शाळेत ' शारदोत्सव ' संपन्न झाला असेल. तसाच तो आमच्या शाळेतही दिमाखात साजरा झाला. तुमच्याही शाळेत ' सरस्वती पूजन ' झालेच असेल. हो ना!!!!
दरवर्षी हा दिवस येतो. पण प्रत्येक वर्षाचा अनुभव आगळा वेगळा असतो. सरस्वती मातेचं ते तेजस्वी रुप पाहून मन भरुन येतं. मला बालपणापासून ' शारदा पूजन ' खूप आवडत आले आहे. मी शिक्षक झाल्यामुळे मी सतत तिच्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे. तिचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे म्हणून मी ' गुरुजी ' झालो आहे.
माझे प्राथमिक शिक्षण कणकवली नं. ३ शाळेत अतिशय संस्कारमय झाले आहे. तिथे साजरा होणारा ' शारदेचा उत्सव ' आमच्यासाठी प्रतिवर्षी मोठ्या उत्सवापेक्षा कमी नसायचा. जणू आमच्या घरात सण साजरा होत आहे असे मला वाटे. त्या शाळेत आम्हांला ' साटमबाई ' होत्या. त्या खूप प्रेमळ होत्या. सरस्वती मातेवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्यामुळेच आम्ही सरस्वती मातेवर जीवापाड भक्ती करु लागलो.
आमच्या वर्गातील एक मुलगा आठवड्यातून एकदा तरी ' फिट ' येऊन जमिनीवर पडत असे. त्यावेळी आमच्या साटमबाई ' सरस्वतीची ' उदी ' त्याच्या छातीला लावत. तो दोन मिनिटात उठून व्यवस्थित झालेला आम्ही कित्येकदा पाहिला आहे. आमची देवीवर श्रद्धा होतीच, पण या घटनेमुळे आमची तिच्यावरील श्रद्धा अधिक दृढ होत गेली.
आता मी शिक्षक असल्याने सरस्वती मातेच्या सातत्यपूर्ण सानिध्यात असल्याने तिचे दैनंदिन वरदान लाभते आहे ही जमेची बाजू आहे. आमच्या शिडवणे नं. १ शाळेत दरवर्षीप्रमाणे ' शारदोत्सव ' उत्साहात साजरा करण्यात आला होता.
त्यानिमित्ताने सर्व मुलांना सरस्वती मातेची प्रतिमा रंगविण्यास दिली होती. खरंच सांगतो, मुलांना दिलेला उपक्रम खूपच आवडला. सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने देवीचे चित्र रंगवून आणले होते. त्याच चित्राचे पूजन केले. त्याच चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. पालकांनी चित्रे पाहिली. आपली मुले चित्र इतकी छान रंगवू शकतात, याबद्दल त्यांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमानच वाटला. हा अभिमान मी प्रत्येक पालकांच्या डोळ्यात पाहत होतो. सरस्वतीच्या चित्राच्या वरच्या बाजूला ' शारदे हवे तुझे वरदान ' असे वाक्य छापले होते. त्यामुळे प्रत्येक मूल ते वाक्य वाचून आपल्या विद्येच्या आराध्य दैवताला ' वंदन ' करताना दिसत होते. सुंदर चित्र रंगविणाऱ्या मुलांना जलरंगांची सप्रेम भेट देण्यात आली. इतर सर्वांना रंगीत खडुची पेटी मिळाली. चित्रकलेला आणि भक्तीला प्रोत्साहन मिळाले.
मुलांनी ' सर्वमंगल मांगल्ये ', ' नमस्ते शारदा देवी ' अशी सरस्वती स्तवने म्हटली. मुलांचा, शिक्षकांचा, पालकांचा आणि उपस्थित सर्वांचा आनंद मी टिपत चाललो होतो. सर्वांचा ' सरस्वती ' साठीचा हा एक दिवस अविस्मरणीय ठरला होता. मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, सरस्वती मातेच्या सहवासात राहण्यासाठी तुम्हांला सतत अभ्यास करत राहायला हवे, तर श्रीदेवी शारदामाता तुमच्यावर सदैव वरदहस्त ठेवेल यांत अजिबात शंका नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल
मुख्याध्यापक, शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment