🛑 निष्पाप मुलांचा विश्वास
सहा तास मुलांसोबत असले तरी शिक्षक म्हणजे मुलांचे आदर्श व्यक्तिमत्त्व असतात. पूर्ण दिवसाच्या पाव भागापुरते मुलांसमोर वावरणारे शिक्षक अप्रत्यक्षपणे मुलांसोबतच असतात. ही मुलेही शिक्षकांच्या सदासर्वदा डोळ्यासमोर येत राहतात. कारण शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांसारखंच नव्हे , तर त्याहीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करतात.
कधी त्यांना रागावतात , त्यांना चापटी देतात. छोटी मुलं हे सर्वकाही काही क्षणात विसरुन जातात. मात्र ओरडल्यानंतर त्यांना जवळ घेणे , नीट समजावून सांगणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.
शिक्षक होणं कदाचित सोपं असू शकतं , पण शिक्षक म्हणून जगणं एक कठीण गोष्ट आहे. त्यासाठी मुलांच्या भावविश्वात डोकावायला हवे. हे एकदा जमले की तुमच्या समोरची मुले तुमची मुले होऊन जातात. ती तुमच्यावर इतका विश्वास ठेवतात की पालकांवरही त्यांचा तितका विश्वास नसतो.
तुम्ही मुलांना एखादा शब्द देता , तेव्हा त्या शब्दाला जागणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मुलांचा तुमच्यावरील विश्वास कमी होण्याची भीती असते. शिकवताना बोलता बोलता आपण मुलांना विविध उपक्रमांची माहिती देत असतो. ते करवून घेत असतो. उपक्रम असला की मुलं त्यात अधिक लक्ष घालतात. आपण शिकवतोय असं मुलांना वाटलं तर मुलांचं लक्ष विचलित होऊ शकतं.
याचा अर्थ असा आहे की मुलांना शिकायला आवडत असतं , पण शिकवून घ्यायचा कंटाळा येत असतो. एखादी गोष्ट त्यांना करायला दिली की ती लगेच तयार होतात. भाग न घेणारी मुलेही त्यात भाग घेऊ लागतात.
आज आमच्या शाळेतील मुलांना शिक्षक होण्याची संधी दिली होती. दोन दिवस मुलं आपण शिक्षक बनणार या कल्पनेनेच अधीर झाली होती. शनिवारी सकाळची शाळा म्हणजे थोडी उशिरा येणारी मुले आज मात्र शिक्षक बनून लवकर शाळेत दाखल झाली होती. त्यांच्या अंगात आज शिक्षक शिक्षिका संचारल्या होत्या.
सर्व विद्यार्थी आजच्या नव्या शिक्षकांना सर ,मॅडम म्हणत होती. ते ऐकताना नवीन शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज त्यांना शिक्षकांसारखे खुर्चीत बसायला मिळाले होते.
नव्या टिचर्सनी छान प्रार्थना घेतली. विद्यार्थी असताना लुडबुड करणारे शिक्षक आज मात्र गंभीरपणे प्रार्थना म्हणताना दिसत होते. त्यांचा एक दिवसाचा शिक्षक होण्याचा आनंद देत असताना आम्हां शिक्षकांनाही नवीन शिक्षकांबद्दल अतीव आदर वाटत होता. शिक्षकांचा पेहराव मुलांच्या तनामनात शिक्षकांचं जगणं पेरुन गेला होता. शाळा सुटेपर्यंत विद्यार्थ्यांनी केलेली शिक्षकांची भूमिका शिक्षकी पेशाला साजेशी अशीच होती. नवीन शिक्षक मुलांना प्रेमाने शिकवत होते. कुणी आपल्या फळ्यावरील तिरप्या अक्षराला पाहून हसत सुटले होते. मी वर्गावर्गात जाऊन त्यांचे फोटो घेत होतो. कुणाचेही फोटोकडे लक्ष नव्हते. प्रत्येक शिक्षक आपल्या वाटणीला आलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात दंग असलेले पाहून मलाही तोंडात बोट घालण्याची वेळ आली.
ही छोटी मुले इतकी निष्पाप असतात की त्यांचा आपल्या शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीवर ठाम विश्वास असतो. या मुलांचे पालकही लहानपणी तसेच असले पाहिजेत. त्यांचाही आपल्या शिक्षकांवर विश्वास होताच असणार. हा शिक्षकांबद्दलचा आदर आणि विश्वास सदासर्वकाळ वाढवत नेण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ?
©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली
( 9881471684 )


No comments:
Post a Comment