🛑 मूल निरागस हो
मुलांनो , तुम्हाला आज एक विनंती करायची आहे. कृपया खोटे कधी बोलू नका. तुम्ही एखादी घटना पाहता किंवा ऐकता , ती तुम्हाला दुसऱ्यांना सांगायची असल्यास जरुर सांगा , पण त्यात स्वतःच्या मनाचे काही घालू नका. मीठ मसाला लावू नका. जे ऐकले , पाहिले ते तसेच सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जमेल ते तुम्हाला. प्रयत्न केलात तर ते अशक्यही नाही.
तुम्ही त्यात तुमच्या मनाच्या गोष्टी घालण्याचा वेडेपणा करता आणि अर्थाचा अनर्थ करता. त्यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते. ज्यांना खरेपणा आवडतो ना , त्यांना मस्करीतही खोटे बोलणे पटत नाही. म्हणून माझे तेच खरे म्हणू नका , नेहमी खरे ते माझेच असे म्हणा. हेही तुम्हाला अधिक प्रयत्नाने जमेल.
तुम्हाला कधी कोणाला कसले वचन द्यायचे असेल , तर पुनःपुन्हा विचार करा. आपल्याला अशी सवय असू शकते. मी असे करणार आहे , तसे करणार आहे. पण करत मात्र काहीच नाही. या अशा गोष्टींमुळे तुमच्यावर इतरांचा विश्वास बसत नाही. तुम्ही लबाड आहात असे कोणी म्हटले तर तुम्हाला ते आवडेल का ? नाही ना ? मला वाटलेच होते. तुम्ही लबाडी करणार नाही आणि लबाड म्हणवून घेणार नाही. तुमच्यावर सर्वांनी सदासर्वकाळ विश्वास ठेवावा अशी वागणूक ठेवा. बघा तुम्हाला किती आनंद होतो ते !!!
तुमच्या हातून एखादी चूक घडली तर लगेच मान्य करा. सबब सांगू नका. तुम्हाला जरी भीती वाटत असली तरीही चुकीची कबुली दिल्यामुळे तुम्हाला शिक्षा मिळाली तर तिचा खुल्या दिलाने स्विकार करा. कदाचित तुम्हाला शिक्षा मिळणारही नाही. पण शिक्षा मिळत नाही म्हणून खरे बोलावे हेही बरोबर नाही. खरे बोलणे हा तुमच्या आतील सत्याचा विजय असतो हे नेहमी ध्यानात ठेवा.
तुम्हाला कोणी रागावल्यास तेही सहन करण्याची शक्ती तुमच्यात यायला हवी. तुमच्या डोळ्यांतील पाणी त्याचे साक्षीदार असते.
दुसऱ्यांना दुःख देऊन जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर हिच खूप वाईट गोष्ट आहे. अशा वाईट गोष्टी मनात आल्या तर त्या घालवून द्या. तुमच्याबाबतीत असे घडेल तर तुम्हाला बरे वाटेल काय ? नाही ना ? प्राणिमात्रावर दया करा. त्यांना दुःख देऊन आपणांस सुख मिळत असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तीही चुकीची गोष्ट आहे.
तुम्ही एखाद्या बागेत गेला आहात , तेथील फुलपाखरे पाहून तुम्हाला खूप आनंदही झाला असेल. तो आनंद तसाच जपून ठेवा. फुलपाखरांना पकडून त्यांचे पंख कुस्करुन त्यांच्या सुखाचे दुःख करु नका. तुम्ही असे कधी केले असेल तर आता पुढे तरी करु नका. तुम्ही निरागस आहात , आणि निरागसच राहा.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
.jpeg)
No comments:
Post a Comment